हमालांच्या मनमानी शुल्क आकारण्याला बसणार चोप, मोबाईल अॅपवरुन करता येणार हमालांचे ऑनलाईन बुकिंग

हमालांकडून रेल्वे स्थानकात आकारण्यात येणा-या अतिरिक्त शुल्कास आळा बसावा यासाठी ही मोबाईल अॅप सुरु करण्यात आला आहे.

Coolie Representative Image (Photo Credits: File Image)

सध्याच्या ई-कॉमर्स जगात आपल्याला कोणत्याच गोष्टी जास्त काळ वाट पाहावी लागत नाही. कोणतीही गोष्ट केवळ एका क्लिकवर आपल्याला घरपोच मिळते. तसेच ओला आणि उबरमुळे प्रवास करणेही आता सहज शक्य झाले आहे. त्यासाठी रिक्षाच्या लाईनमध्ये तासनतास उभे राहा, प्रवासी भाड्यावरुन रिक्षाचालकांशी हुज्जत घालावी लागत नाही. या ऑनलाईन पद्धतीचा स्विकार करत आता मध्य रेल्वे ने हमालांचीही (Coolie) ऑनलाईन बुकिंग करण्याची सेवा करणार आहे. हमालांकडून रेल्वे स्थानकात आकारण्यात येणा-या अतिरिक्त शुल्कास आळा बसावा यासाठी ही मोबाईल अॅप सुरु करण्यात आला आहे.

या अॅपचे नाव आहे 'यात्री' अॅप (Yatri App). लांबच्या प्रवासाला जाणारे प्रवासी जादा सामान घेऊन जातात. रेल्वे स्थानकात सामानाचं दरपत्रकही लावण्यात आलेलं असताना अनेक हमाल मनमानी पद्धतीने प्रवाशांकडून शुल्क आकारतात. अनेकदा शुल्क आकारणीवरून प्रवाशांशी हुज्जतही घालतात. त्याबाबतच्या तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे याआधी करण्यात आल्या होत्या.

त्याचप्रमाणे अनेकदा हमाल म्हणून नोंद नसतानाही अनेक बाहेरची मुलं सामान वाहून नेण्याचं काम करतात. त्यामुळे प्रत्येक हमालाला बायोमॅट्रीक कार्ड देण्यात येणार आहे. केवळ नोंदणीकृत हमालांनाच हे काम मिळावं म्हणून हे कार्ड देण्यात येत असल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलं.

हेही वाचा- राजधानी, दुरांतो आणि शताब्दी एक्सप्रेसमध्ये महिलांसाठी सुरु करण्यात येणार स्पेशल कोचेस, या कोचेसमधील असतील महिलांसाठी विशेष सोयी सुविधा

 

ओला-उबरच्या धर्तीवरच हे अॅप तयार करण्यात येणार आहे. त्यात सामान कुठपर्यंत वाहून न्यायचं, त्याची संख्या आणि वजन याबाबतची माहिती विचारून शुल्क आकारण्यात येणार आहे.