ठाणे- दिवा स्थानकाच्या दरम्यान तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकाच्या दरम्यान पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडामुळे अप आणि डाऊन रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.परिणामी ठाणे ते दिवा दरम्यान लोकल वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.
मुंबईमध्ये जोरदार पावसामुळे मागील आठवड्यात मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावरील लोकलसेवा अक्षरशः कोलमडून पडली होती. पावसाचा जोर किंचित कमी झाल्यावर आता कुठे लोकल पूर्वपदावर येऊ लागल्या असताना आज दुपारी 4 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकाच्या दरम्यान पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडामुळे अप आणि डाऊन रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे ऐन सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीलाच कामावरून घराकडे परतणाऱ्या चाकरमान्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, ठाणे ते दिवा स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने लोकलची वाहतूक धीम्या गतीने सुरु होती मात्र काहीवेळाने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. दुपारची वेळ असल्याने ट्रेन मध्ये फार गर्दी नव्हती मात्र हा बिघाड वेळेत दुरुस्त न झाल्यास मुंबईकडून आणि कर्जत-कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. लोकलसेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र अद्याप रेल्वेकडून हा बिघाड दुरुस्त करण्यास किती वेळ लागेल याची कोणतीच सूचना देण्यात आलेली नाही. परिणामी ठाणे ते दिवा दरम्यान लोकल वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसात तुफान पावसाने रेल्वे प्रवाशांची अगदी दैना झाली होती. लोकलसोबतच लांब पल्ल्याच्या विशेषतः कोकणात जाणाऱ्या गाडयांना याचा मोठा फटका बसला होता. अजूनही मुंबई सह ठाणे, कल्याण- डोंबिवली दरम्यान पावसाचा जोर कायम असल्याने लोकल उशिराने धावत आहेत.