मध्य रेल्वे वर आज मध्यरात्री धावणार 6 विशेष लोकल; गणेशोत्सवात प्रवाशांना खास भेट, जाणून घ्या वेळापत्रक
या लोकलगाड्या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत त्यामुळे प्रवाशांनी या वेळापत्रकाची दाखल घेऊन आपला प्रवास प्लॅन करावा.
गणेशोत्सवाचे (Ganeshotsav 2019) आता अवघे काहीच दिवस शिल्लक असताना मुंबईत अजूनही भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. लाडक्या बाप्पांची भेट घेण्यासाठी सर्वच भाविक आपल्या वेळापत्रकातून सवड काढून रात्रीच्या वेळी दर्शनाला जाण्याचा बेत आखत आहेत. या भाविकांना एक खास भेट म्हणून मध्य रेल्वे (Central Railway) नी आज म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी मध्य रात्रीच्या वेळी 6 विशेष लोकल गाड्यांची (Special Locals) फेरी सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत एक ट्विटच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाने नुकतीच माहिती दिली आहे. या लोकल ट्रेन सर्व स्थानकांवर थांबणार आहेत त्यामुळे प्रवाशांनी या वेळापत्रकाची दाखल घेऊन आपला प्रवास प्लॅन करावा.
प्राप्त माहितीनुसार, आज रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी कल्याण वरून पहिली विशेष लोकल धावणार आहे, यानंतर सीएसएमटी वरून 1 वाजून 35 मिनिटांनी कल्याण ला जाणारी, 2 वाजून 30 मिनिटांनी ठाणे तर 3 वाजून 30 मिनिटांनी पुन्हा एकदा कल्याणकडे विशेष लोकल सोडण्यात येईल. याशिवाय मध्यरात्री 1 वाजता व त्यानंतर तासाभराने म्हणजेच 2 वाजता ठाणे येथून सीएसएमटी कडे जाणारी आणखीन एक ट्रेन धावणार आहे. (मुंबई लोकल रेल्वे प्रवासादरम्यान स्टंट करणाऱ्यांनो सावधान! भोगावी लागेल पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा)
मध्य रेल्वे ट्विट
दरम्यान, काल मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा स्थानकाच्या दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने लोकलची वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी लोकलच्या फेऱ्या आजही सकाळी 15 ते 20 मिनिट उशिराने धावत होत्या. या विशेष लोकलमुळे गणेशोत्सवात मेन लाईन वर झालेली गर्दी आटोक्यात येईल अशी आशा मध्य रेल्वेने व्यक्त केली आहे.