Sharad Pawar On Maharashtra Political Crisis: साताऱ्यात शरद पवारांचा शक्तिप्रदर्शन; म्हणाले, 'महाराष्ट्रात जातीचे राजकारण चालणार नाही'

आमची विचारधारा जातीयवादाच्या विरोधात आहे. महाराष्ट्राला आपली एकजूट दाखवावी लागेल, असं आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केलं.

Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

Sharad Pawar On Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या सत्तानाट्यावर सातत्याने राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज साताऱ्यात (Satara) शक्तिप्रदर्शन केलं आहे. पवार यांनी यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा नव्याने आपण पक्ष बांधणी करणार असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रात जातीचे राजकारण चालणार नाही. आमची विचारधारा जातीयवादाच्या विरोधात आहे. महाराष्ट्राला आपली एकजूट दाखवावी लागेल, असं आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केलं.

भाजप राज्यात निवडून आलेली सरकारे पाडत आहेत. आपल्याला नव्याने सुरुवात करावी लागेल. 5 जुलै रोजी पक्षश्रेष्ठींची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली असल्याचंही यावेळी शरद पवार यांनी सांगितलं. यावेळी शरद पवार यांनी भाजपाला उलथापालथ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा पक्ष असं नाव दिलं. तसंच या प्रवृत्ती आपल्या बाजूला सारायाच्या आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी माझ्या गुरुंच्या चरणी वंदन करुन तुम्हाला हे सांगतो आहे, असं भावनिक आव्हानही यावेळी पवार यांनी केलं. शरद पवार यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. (हेही वाचा - NCP Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार कराडकडे रवाना, अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर महाराष्ट्रात उलथापालत)

आम्ही उद्धव ठाकरेंसोबत महाराष्ट्राची सेवा करत होतो, पण काही लोकांनी सरकार पाडलं. देशाच्या विविध भागांत असेच घडले. आज महाराष्ट्रासह इतर देश समस्यांना तोंड देत आहेत आणि समाज जात आणि धर्माच्या आधारावर विभागला जात आहे, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये अजित पवार यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील हालचाली पुन्हा एकदा तीव्र झाल्या आहेत. मात्र, अजित यांच्यासह किती आमदार राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत ​​आहेत, हे अद्याप स्पष्ट झाले नसून, हा आकडा 40 पेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे. सध्या राष्ट्रवादीने बंडखोरांवर कारवाईची तयारी सुरू केली आहे.