Mumbai: अल्पवयीन मुलीला 'आयटम' म्हणणं तरुणाला पडलं महागात; न्यायालयाने आरोपीला सुनावली दीड वर्षांची शिक्षा

Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Mumbai: एका अल्पवयीन मुलीला 'आयटम' (Item) म्हणणं एका तरुणाला चांगलचं महागात पडलं आहे. न्यायालयाने आरोपीला दीड वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मुलीला उद्देशून "आयटम" हा शब्द फक्त तिच्या लैंगिकतेसाठी वापरला जातो, असे निरीक्षण नोंदवत विशेष पोक्सो न्यायालयाने गेल्या आठवड्यात मुंबई शहरातील एका 25 वर्षीय व्यावसायिकाला दोषी ठरवून दीड वर्षांची शिक्षा सुनावली.

प्राप्त माहितीनुसार, 2015 मध्ये शाळेतून परतत असताना 16 वर्षीय मुलीचे केस ओढून "क्या आइटम किधर जा रही हो" असे म्हणत लैंगिक छळ केल्याप्रकरणी या आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. आरोपी घटनेच्या एक महिन्यापूर्वी लैंगिक हेतूने या मुलीचा पाठलाग करत असल्याचेही न्यायालयाला आढळून आले. (हेही वाचा - Amravati Railway: अमरावतीत रेल्वे रुळावरुन मालगाडी घसरली, बडनेरा-वर्धा अप-डाऊन मार्गावर रेल्वे वाहतुक विस्कळीत; पहा व्हिडीओ)

आरोपीला चांगल्या वर्तणुकीवर सोडण्यास नकार देताना विशेष न्यायाधीश एस जे अन्सारी म्हणाले, "अशा गुन्ह्यांना कठोरपणे सामोरे जाणे आवश्यक आहे. कारण महिलांच्या सुरक्षेसाठी अशा रोड-साइड रोमिओना धडा शिकवणे आवश्यक आहे.

आरोपीने न्यायालयासमोर दावा केला की, त्याला फसवण्यात आलं आहे. मुलीच्या पालकांना तरुणाने त्यांच्या मुलीसोबत केलेली मैत्री आवडत नसल्यामुळे त्याला या प्रकरणी अडकविण्यात आले. तथापि, अल्पवयीन पीडितेने सांगितले की, ती 14 जुलै 2015 रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास शाळेत जात होती. आरोपी आपल्या मित्रांसोबत गल्लीत बसला होता. यावेळी आरोपी तिच्या मागे आला आणि त्याने तिचे केस ओढले आणि तिला आयटम म्हणाला. यानंतर मुलीने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला होता.