कसारा घाटात कॅब ड्रायव्हरचं अपहरण करून हत्या केल्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशातील 2 जणांना अटक
पोलिस तपासामध्ये त्यांनी मृतदेह कुठे गाडला याची कबुली दिली आहे
कसारा घाटात क्रुरपणे कॅब ड्रायव्हरची हत्या करून मृतदेह फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किडनॅपिंग आणि हत्या या प्रकरणात उत्तर प्रदेशातील दोघांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान अटक केलेल्यांची नावं राहुल कुमार गौतम ( वय 24 वर्ष) आणि धर्मेंद्रकुमार (वय 27 वर्ष) अशी आहेत. यांच्यासोबतच 4 साथीदारांनी इ ऑगस्टला कल्याण मधून धुळ्याला जाण्यासाठी कॅब बूक केली.
सहा जण प्रवास करताना कॅब जशी कसारा घाटात पोहचली तशी त्यांनी कॅब ड्रायव्हरला गाडी थांबवण्याचे निर्देश दिले. धारदार वस्तूने कॅब ड्रायव्हरचा खून करून त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकून दिला आणि ते गाडी घेऊन उत्तर प्रदेशला पळाले. नंतर कॅब ड्रायव्हरची हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली. कॅब बूक केलेल्या मोबाईल वरून नंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. प्रवसादरम्यानची सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आली. Malad Crime News: बायको पुन्हा आपल्याकडे परत यावी म्हणून रचला पोटच्या मुलांच्या मृत्यूचा देखावा.
पोलिसांच्या हाती लागलेल्या पुराव्यांच्या आधारे 9 ऑगस्टला उत्तर प्रदेशातील भादोही मधून दोघांना अटक करून त्यांना महाराष्ट्रात आणण्यात आले. पोलिस तपासामध्ये त्यांनी मृतदेह कुठे गाडला याची कबुली दिली आहे. पोलिसांच्या हाती मृतदेह लागला आहे मात्र तो बर्याच प्रमाणात डिक्म्पोस्ट झाला होता. पण तो पोस्टमार्टम साठी देण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या दोघांनी कॅब लुटण्याचा प्रकार हा उत्तर प्रदेशातील एका गॅरेज मालकाच्या सांगण्यावरून केल्याचही कबूल केले आहे. सध्या गाडी पोलिसांच्या ताब्यात असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.