Buldhana: धक्कादायक! 8 वर्षांच्या चिमुकल्याकडून साफ करून घेतले क्वारंटाईन सेंटरमधील टॉयलेट; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अधिकारी निलंबित

बुलडाण्याच्या संग्रामपूर तहसीलच्या मारोड गावात कोरोना संक्रमित रूग्णांसाठी शाळेत बांधल्या गेलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये, आठ वर्षाच्या निरागस मुलाकडून टॉयलेट (Toilet) साफ केल्याची घटना घडली आहे.

Representative image | Quarantine Center (Photo Credit: ANI)

महाराष्ट्रातील बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातून एक अत्यंत लाजीरवाणी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बुलडाण्याच्या संग्रामपूर तहसीलच्या मारोड गावात कोरोना संक्रमित रूग्णांसाठी शाळेत बांधल्या गेलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये, आठ वर्षाच्या निरागस मुलाकडून टॉयलेट (Toilet) साफ केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या राज्यात चर्चेचा विषय आहे. एकीकडे राज्य सरकार मुलांच्या सुरक्षेचा दावा करत आहे, तर दुसरीकडे अशी चित्रे राज्यातील मुलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी संबंधित ग्रामसेवकाला निलंबित केले आहे.

महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातील सरकारी शाळांना क्वारंटाईन सेंटरमध्ये रूपांतरित केले आहे. जेणेकरुन कोरोना संक्रमित रूग्णांना तिथे ठेवता येईल आणि इतर लोकांना संक्रमणापासून वाचवता येईल. परंतु बुलडाणा जिल्ह्यातील या विचित्र घटनेने मुलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. जर या मुलास कोरोना विषाणू संसर्ग झाला तर त्यास जबाबदार कोण? राज्यातील इतर शाळांमध्येही अशीच परिस्थिती आहे का? असे प्रश्न विचारले जात आहेत.

दुर्दैवाची बाब अशी की, ग्रामपंचायत कर्मचारी या मुलाकडून स्वच्छतागृहाची सफाई करून घेत आहे व असेही सांगत आहे की, याबद्दलची माहिती गटविकास अधिकाऱ्यांना आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती गठीत केली आहे व त्यांना तीन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणात जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. या घटनेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांकडे संबंधित कर्मचारी, गटविकास अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा: कोरोना काळात रुग्णांची सेवा बंद केली तर कठोर कारवाई करू- नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव)

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथून धक्कादायक बातमी समोर आली होती. रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी 11 हजार रुपये कमी पडत असल्याने, रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या पत्नीचे मंगळसूत्र काढून घेतले होते.