Buldhana Bus Accident: समृद्धी महामार्गावर झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बस अपघातामधील 25 मृतांवर आज सामुहिक अंत्यसंस्कार

नागपूर कडून पुण्याला येत असलेल्या बसला काल सिंधखेडराजा जवळ रात्री दीड च्या सुमारास भीषण अपघात झाला आहे.

Buldhana Accident (PC - ANI)

समृद्धी महामार्गावर (Samrudhi Mahamarg) काल (1 जुलै) बुलढाण्याच्या (Buldhana) सिंधखेडराजा मध्ये खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 25 जण जागीच जळून मृत्यू पावले. बस पलटली आणि डिझेलची टाकी फुटून स्फोट झाला. दरम्यान यामध्ये 8 प्रवाशांनी काचा फोडून खिडकीतून बाहेर पडून आपला जीव वाचवला. परंतू ज्यांनी जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आता प्रशासनाने अशा स्थितीमध्ये जळलेल्या अवस्थेमधील मृतांच्या कुटुंबियांशी बोलून आज (2 जुलै) त्यांच्यावर सामुहिक अंत्यसंस्कार (Mass Funeral) करण्याचा निर्णय घेतला आहे.

विदर्भ ट्रॅव्हल्सच्या या अपघातग्रस्त बस मध्ये 22 प्रवासी वर्धा येथील होते. 25 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला असल्याने त्यांची ओळख पटवणं आता कठीण झाले आहे. डीएनए टेस्ट करून ओळख पटवणं ही प्रक्रिया जिकरीची आणि वेळखाऊ आहे तो पर्यंत मृतदेह ठेवणं कठीण आहे त्यामुळे आता प्रशासनाने कुटुंबियांशी बोलून तातडीने मृतदेहावर सामुहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.

खाजगी बसच्या अपघाताची आरटीओ विभागाकडून चौकशी करण्यात आली आहे. आरटीओ कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अपघात टायर फुटून झाला नाही तर बस रोड डिव्हायडरवर आदळल्याने झाला. गाडीचा वेग अनियंत्रित होऊन ती घासली गेली त्यात बसच्या समोरचा एक्सेल तुटल्याने बस उलटली. डिझेल टँक फुटल्याने घर्षण होऊन आग लागल्याचा प्राथमिक अहवाल आरटीओने दिला आहे. नक्की वाचा: Buldhana Bus Accident: टायर फुटल्यानंतर बसमधील ज्वलनशील वस्तूंमुळे लागली आग; अपघातग्रस्त बस मालकाची प्रतिक्रिया .

आरटीओच्या प्राथमिक अहवालानंतर पोलिसांनी वाहनचालक दानिश शेख इस्माईल शेखवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आयपीसी 304, मोटर व्हेईकल ऍक्ट 134, 184, 279 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून 25 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका वाहन चालकावर ठेवण्यात आला आहे.