BMC वर आयकर विभागाचे छापे; 735 कोटी रूपयांची बेहिशेबी मालामत्ता जप्त
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिलेल्या माहितीनुसार काही कंत्राटदार कर्जाच्या माध्यमातून पैसे घेतात आणि त्याचा अतिरिक्त खर्च दाखवून पैशांचा गैरव्यवहार करतात.
महाराष्ट्रामध्ये राजकीय कोंडी असताना आता केंद्र सरकारच्या आयकर विभागाकडून मुंबई महानगर पालिकेच्या खाजगी कंत्राटदारांवर छापे टाकले आहेत. मुंबई आणि सुरत येथील 44 ठिकाणी तपास आणि छापे टाकण्यात आले असून सुमारे 735 कोटी रूपयांचे बेहिशेबी मालामत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आहे. यामध्ये पालिकेच्या अधिकार्यांसोबतच शिवसेना पक्षाचे पालिकेशी संबंधित अनेक बड्या नेत्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या राज्यात शिवसेना - भाजपा यांच्यामध्ये बिनसल्याने आता शिवसेना पक्ष भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यासोबत सत्ता स्थापना करण्याच्या तयारीमध्ये आहे.
दरम्यान आयकर विभागाकडून मुंबई शहरातील महापालिकेच्या कंत्राटदारांना लक्ष्य करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिलेल्या माहितीनुसार काही कंत्राटदार कर्जाच्या माध्यमातून पैसे घेतात आणि त्याचा अतिरिक्त खर्च दाखवून पैशांचा गैरव्यवहार करतात. या प्रकारामध्ये सुमारे 37 मोठ्या कंत्राटदारांच्या नावांचा समावेश असल्याचं आता समोर आलं आहे. सध्या या प्रकरणी आवश्यकता असल्यास पालिकेतील अधिकारी, नेते मंडळी यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
6 नोव्हेंबर पासून पालिकेतील विविध विभागांमध्ये चौकशी सुरू असून 37 ठिकाणांहून अधिक भागांमध्ये ही चौकशी सुरू आहे. यामध्ये कारवाईमधून कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर बुडवल्याचे तसेच आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे हाती लागल्याची माहिती एका वृत्तवाहिनीला देण्यात आली आहे.