येस बँक घोटाळ्यातील आरोपी कपिल वाधवान, धीरज वाधवान यांची अटकपूर्व जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
मागील आठवड्यात धीरज आणि कपिल वाधवान यांना सीबीआयने (CBI) ताब्यात घेतले होते.
येस बँक (Yes Bank) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी कपिल वाधवान (Kapil Wadhawan) आणि धीरज वाधवान (Dheeraj Wadhawan) यांची अटकपूर्व जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) फेटाळली आहे. मागील आठवड्यात धीरज आणि कपिल वाधवान यांना सीबीआयने (CBI) ताब्यात घेतले होते.
मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांच्या सीबीआय कोठडीत वाढ केली होती. त्यामुळे त्यांना 10 मे पर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्यात आले होते. वाधवान कुटुंबियांनी लॉकडाउनच्या काळात मुंबई ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाधवान कुटुंबियांचा क्वारंटाइन संपल्यानंतर अटक करण्यात आली होती. (हेही वाचा - दिल्लीत UPSC ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थांचा राज्यात परतण्याचा मार्ग मोकळा; 1400 विद्यार्थ्यांसाठी धावणार स्पेशल ट्रेन)
गृह विभागातील प्रधान सचिव (विशेष) आयपीएस अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबियांना महाबळेश्वरला जाण्यासाठी इमरजन्सी पास दिला होता. तेव्हापासून वाधवान कुटुंब चर्चेत आले होते. या पासच्या मदतीने सीबीआय आणि ईडीपासून वाचण्यासाटी खंडाळ्याजवळ लपलेले वाधवान कुटुंबातील 21 लोक पाच गाड्यांमध्ये 8 एप्रिल रोजी महाबळेश्वर येथील आपल्या फार्महाउसला जात होते. मात्र, पोलिसांनी त्यांना रस्त्यात पकडले होते. लॉकडाउनचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाधवान कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने धीरज आणि कपिल वाधवान यांना 7 मार्च रोजी चौकशीसाठी बोलावले होते. परंतु, वाधवान बंधु चौकशीसाठी उपस्थित राहिले नाही. सीबीआयसमोर हजर न राहिल्याबद्दल स्थानिक न्यायालयाने त्यांच्याविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. तपास यंत्रणांपासून वाचण्यासाठी ते मुंबईच्या बाहेर पळून गेले होते. मात्र, सातारा पोलिसांनी महाबळेश्वरच्या काही किलोमीटर अलिकडेच त्यांना पकडले होते.