परदेशी शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांच्या दोन कोविड डोसमधील कालावधी कमी करा, BMC चे केंद्राला पत्र
दोन लसींमधील कालावधी 84 दिवसांवरून 42 ते 60 दिवसांवर करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
परदेशी शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांसाठी मुंबईत आज, उद्या आणि परवा खास वॉक इन कोविड लसीकरण (COVID Vaccination) देण्यात येणार आहे. दरम्यान या विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या दोन कोरोना डोसमधील अंतर कमी करण्यात यावे अशी मागणी मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) करण्यात आले आहे. यासाठी मुंबई मनपाने केंद्राला पत्राद्वारे विनंती केली आहे. दोन लसींमधील कालावधी 84 दिवसांवरून 42 ते 60 दिवसांवर करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
सध्या कोविशिल्डच्या दोन लसींमधील कालावधी 84 दिवसांचा असल्याने, विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी, दोन लसींमधील कालावधी 84 दिवसांवरून 42 ते 60 दिवसांवर करण्याची मागणी करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याबाबतची माहिती दिली.हेदेखील वाचा- Coronavirus Vaccination in Mumbai: 45 वयापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी वॉर्डातील केंद्र आणि त्यासंबंधितची माहिती BMC कडून जाहीर
सध्या मुंबईत सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीन दिवशी कस्तुरबा, कूपर आणि राजावडी इथं परदेशात जाणाऱ्यांना विद्यार्थ्यांना लस देणे सुरू आहे. परदेशात ऑगस्टच्या सुरुवातीला कॉलेज सुरु होत असल्यानं त्यापूर्वी दोन्ही लस दिल्याचे सर्टिफिकेट मुलांना मिळणे आवश्यक आहे. शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वॉक इन सुविधेद्वारे लस देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेकडून लसीकरणाबाबतच्या सुधारित नियमावलीनुसार, ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे त्यांना वॉक इन (Walk In) सुविधेद्वारे लस दिली जाणार आहे. यात 18 ते 44 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश असेल.