भंडारा अग्नितांडवानंतर मुंबईतील सर्व हॉस्पिटल्सची तपासणी BMC कडून सुरु

या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून पालिका प्रशासन आता अधिक सतर्क झालं आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व रुग्णालयांची नव्याने तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.

BMC | (Photo Credits: Facebook)

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील रुग्णालयाला आग लागून झालेल्या दुर्घटनेत 10 चिमुकल्या जीवांचा अंत झाला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून मुंबई पालिका प्रशासन आता अधिक सतर्क झालं आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व रुग्णालयांची नव्याने तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, गोवंडी-मानखुर्द, शिवाजीनगर भागात तब्बल 40 हून अधिक नोंदणी नसलेली कार्यालये सुरु असल्याचे समोर आले आहे. तसंच मुंबईतील बहुतांश रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणा नाही. फायर एक्सटिग्विश सारख्या सुविधांची सोय नाही. आपत्तीकाळात बाहेर पडण्याचे मार्ग सुकर नाहीत. त्यामुळे एकंदर सुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण आहे.

मुंबईतील सर्वच रुग्णालयांची तपासणी सुरु केली आहे. लहानसहान गोष्टींची बारकाईने परिक्षण करुन अहवाल तयार केला जात आहे. त्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र कोणाकडे आहे, नाही? कोण नियमांचे उल्लंघन करीत आहेत, हे स्पष्ट होईल, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे. (Bhandara Hospital Fire Update: भंडारा येथील अग्निकांडात रुग्णालयातील 6 जणांवर कारवाई, डॉक्टर, सर्जन आणि परिचारिकांचाही समावेश- राजेश टोपे)

दरम्यान, 9 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा जनरल हॉस्पिटलच्या सिक न्यू बॉन केअर युनिटला आग लागल्याने 10 नवजात बालकांचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. मात्र डोळ्यात अंजन घालणाऱ्या या प्रसंगाने प्रशासनाला जागे केले. तसंच ऑक्टोबर 2020 मध्ये मुलुंड येथील एका खाजगी रुग्णालयाला आग लागल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. यावेळी रुग्णालयातील 40 रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करीत असताना एकाचा मृत्यू झाला होता. रुग्णालयांना आग लागण्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. त्यामुळे पालिकेने उचललेले हे पाऊल अत्यंत स्तुत्य आहे.