High Court on BMC: बीएमसीने जनतेच्या भल्यासाठी पैसा खर्च करावा; मुंबईतील खड्डेमय रस्त्यांवर उच्च न्यायालयाची टिप्पणी

न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने बीएमसी आयुक्त इक्बाल चहल यांना पुढील आठवड्यात भेटण्याचे निर्देश दिले.

Mumbai High Court (Photo Credit: ANI)

High Court on BMC: मुंबईतील खड्डेमय रस्त्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेवर (BMC) ताशेरे ओढले आहेत. बीएमसीने जनतेच्या भल्यासाठी पैसा खर्च करावा आणि शहरातील खड्डेमय रस्त्यांबाबत नागरिकांसाठी काहीतरी करावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई आणि राज्यातील इतर ठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था आणि खड्डेमय रस्त्यांमुळे मृत्यूचे वाढते प्रमाण यावरील याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू होती.

न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने बीएमसी आयुक्त इक्बाल चहल यांना पुढील आठवड्यात भेटण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटलं आहे की, "आमची इच्छा आहे की श्री चहल यांनी पुढच्या आठवड्यात त्यांच्या सोयीनुसार आम्हाला भेटावे. तोपर्यंत त्यांनी मुंबईतील 20 निकृष्ट रस्त्यांच्या सर्वेक्षणाचे काम त्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत करून घ्यावे." (हेही वाचा -Shiv Sena Dasara Melava 2022: शिवजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचाच आवाज, शिवसेना दसरा मेळाव्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी)

न्यायमूर्ती दत्ता म्हणाले की, 2020 मध्ये त्यांची मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते येथे आले होते, तेव्हा त्यांनी अशाच मुद्द्यांवरच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला होता. पण आता दोन वर्षांनी परिस्थिती बदलली आहे.

न्यायमूर्ती दत्ता पुढे बोलताना म्हणाले की, 'मी इतर लोकांसारखा मुंबईत जास्त प्रवास करत नाही, पण माझ्या घरासमोरच्या (दक्षिण मुंबईत) जिथे अनेक व्हीआयपी राहतात. त्या रस्त्याची अवस्था तुम्ही पहा. मी म्हणत नाही की, तुम्ही माझ्या घराबाहेरचा रस्ता दुरुस्त करा. पण न्यायाधीशही नागरिकच असतात आणि बीएमसीने सर्व नागरिकांसाठी काहीतरी करायला हवे, असही न्यायालयाने म्हटले आहे.