BMC on Coronavirus: क्वारंटाईन असताना फिरल्यास FIR, लोकलच्या तिन्ही मार्गांवर 300 मार्शल तैनात; COVID 19 नियंत्रणासाठी मुंबई महापालिका सतर्क

संबंधित व्यक्तीवर थेट एफआयआर दाखल केला जाणार आहे.

BMC | (File Photo)

राज्यात घटलेले कोरोनाचे (Coronavirus) प्रमाण पुन्हा वाढत असल्याचे पाहून राज्य सरकार सतर्क झाले आहे. मुंबई महापालिका (BMC) सुद्धा सावध पावले टाकू लागली असून, उपाययोजना सुरु झाली आहे. कोरोना नियमांचे पालन अधिक कठोरपणे करण्यासाठी त्याची अंमलबजावणीही आता तितकीच कठोर केली जाणार आहे. मुंबई महापलिकेने इशारा दिला आहे की, जर यापुढे क्वारंटाईन (Quarantine) असलेला व्यक्ती रस्त्यावर फिरताना आढळला तर संबंधित व्यक्तीवर पोलीस कारवाई केली जाईल. संबंधित व्यक्तीवर थेट एफआयआर दाखल केला जाणार आहे.

मुंबई महापालिकेने आपल्या म्हटले आहे की, मुबई लोकलच्या मध्य, हार्बर आणि पश्चिमअशा तिन्ही मार्गांवर सुमारे 300 मार्शल तैनात करण्यात येतील. याशिवाय मुंबईत मोठ्या प्रमाणावर होणारी लग्नं, कार्यक्रम, तसेच या कार्यक्रमांसाठी वास्तू उपलब्ध करुन देणारे पब, क्लब, रेस्टॉरंट्स आदींवर धाडी टाकल्या जाणार आहेत. कोरोना व्हायरस संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापलिका ही कारवाई करणार आहे. (हेही वाचा, Coronavirus In Mumbai: वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर BMC पुन्हा अ‍ॅक्शन मोड मध्ये; चेंबूर मधील Maitri Park Society ला कडक नियमावलीचं पालन करण्याचे आदेश)

काही जिल्ह्यांमध्ये वाढत असलेले कोरोनाचे प्रमाण पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा की काय अशी असा विचार सुरु आहे. अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लावावा अशी स्थिती निर्माण झाल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यंनी जिल्हात जमावबंदी आदेश लागू केले आहेत. त्यामुळे जोपर्यंत जमावबंदी आदेश आहेत तोवर 5 पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येता येणार नाही. या शिवाय लग्न अथवा इतर समारंभ, कार्यक्रम आदींसाठी केवळ 50 व्यक्तींचेच बंधण असणार आहे. रुग्णालये व औषध दुकाने सोडून इतर दुकाने व बाजारपेठा केवळ सायंकाळी 7 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यात येणार आहेत.