Mumbai: रस्त्यांवर अवैधरित्या पार्किंग करणा-या खाजगी बसेसना BMC चा दणका, 1 सप्टेंबरपासून भरावा लागणार 15 हजारांचा दंड

1 सप्टेंबर 2019 पासून रस्त्यांवर अवैधरित्या पार्किंग करणा-या खाजगी बसेसच्या वाहनचालकांकडून 15,000 रुपयांचा दंड वसून करण्यात येणार आहे.

Representative Image (Photo Credits: Wikimedia Commons)

मुंबईतील रस्त्यांवर अवैधरित्या पार्किंग करणा-यांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. यात दुचाकी वाहनांपाठोपाठ आता चार चाकी मध्ये खाजगी बसेसही (Private Bus) रस्त्यावर सर्रासपणे पार्किंग करताना दिसत आहेत. या त दिवसेंदिवस होणारी वाढ लक्षात घेता मुंबई महापालिकेने (BMC) अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 सप्टेंबर 2019 पासून रस्त्यांवर अवैधरित्या पार्किंग करणा-या खाजगी बसेसच्या वाहनचालकांकडून 15,000 रुपयांचा दंड वसून करण्यात येणार आहे.

इतकच नव्हे संबंधित बस जप्त करुन त्याचा लिलावही केला जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. बेस्टचे 24 बस आगार आणि 37 बस स्थानकांच्या जागांवर कमी दरात पार्किंग सुविधा उपलब्ध आहे. असे असतानाही ब-याच खाजगी बसेस रस्त्यांवर पार्क केलेल्या असतात. यामुळे अनेकदा वाहतुकीस अडथळा निर्माण ट्रॅफिकच्या समस्येचा नागरिकांना सामना करावा लागतो. त्यामुळे अशा गोष्टींस आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासन स्तुत्यप्रिय असा उपक्रम सुरु करणार आहे.

हेही वाचा- अवैध पार्किंग करणा-यांस आता भरावा लागणार 10,000 रुपयांचा भुर्दंड

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला असताना अशा पार्किंगमुळे गणेशोत्सवात वाहतूककोंडीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हे महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

यात मोठ्या बसेसवर पाच हजार रुपये टोचन शुल्क आणि दहा हजार रुपये दंड असे किमान पंधरा हजार रुपये आकारण्यात येणार आहेत. तसेच ज्या बसगाडीवर एकदा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच अशी बस पुन्हा अनधिकृतपणे पार्क केल्याचे आढळून आल्यास ती जप्त करण्यात येणार आहे. जप्त केलेल्या या बसगाडीचा लिलाव करण्याचेही निर्देशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.