BMC Elections 2022: बीएमसी निवडणूकीसाठी केलेल्या प्रभाग रचनेवरुन काँग्रेस नाराज; नाना पटोले पहा काय म्हणाले!
यापैकी 17 ते 18 वॉर्डमधील बदलांचा थेट फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात पालिका निवडणूकींची बिगुलं वाजणार आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे बीएमसी (BMC) अर्थात मुंबई महानगरपालिका (Mumbai Mahanagar Palika) . या निवडणूकी आधी नवी वॉर्ड पुर्नरचना जाहीर करण्यात आली आहे. यावर भाजपाने आक्षेप घेतलाच होता पण त्यापाठोपाठ आता महाविकास आघाडी मधील कॉंग्रेस पक्षानेही नाराजी व्यक्त केली आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी वॉर्ड पुर्नरचना ही शिवसेनेने सोयीस्कर केल्याचं म्हटलं आहे.
तीन पक्षांचं सरकार असताना सर्व पक्षांनी मिळून वॉर्ड रचना करायला हवी. आपण सोबत राहून जर आपल्या मित्रपक्षाचं नुकसान होत असेल तर ते योग्य नाही, यामुळे आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. दोनचा प्रभाग करण्याची आमची मागणी असताना तीन सदस्यांचा प्रभाग करण्यात आला. मुंबई, पुण्यात महाविकास आघाडीतील काही पक्ष आपल्या सोयीने प्रभाग तयार करत आहेत. आम्ही कोर्टात या बाबत न्याय मागण्याची भूमिका घेणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. Supriya Sule यांचं एक विधान आणि पुन्हा BMC निवडणूकीसाठी शिवसेना-एनसीपी युतीच्या चर्चांना उधाण .
मुंबईत अंदाजे 45 ते 50 वॉर्डमध्ये शिवसेनाला फायदा होईल असं पाहून बदल झाले आहेत अशी चर्चा आहे. यापैकी 17 ते 18 वॉर्डमधील बदलांचा थेट फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे.
पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांच्या वॉर्डमध्ये बरेच फेरबदल झाले, हे बदल जाणूनबुजून केले आहेत. असा त्यांचा आरोप आहे. पण भाई जगताप यांनी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचं म्हटलं आहे.
मागील 25 वर्षांपासून बीएमसीवर शिवसेनेची सत्ता आहे. कोविड 19 संकटामुळे या निवडणूका लांबल्या होत्या. त्यामध्ये ओबीसी राजकीय आरक्षण काढल्यानंतर पालिका निवडणूका लांबणीवर पडल्या आहे. सध्या बीएमसीवर प्रशासक नेमण्यात आला आहे.