Dussehra Melava 2022: शिवाजी पार्क यंदा शांत; दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांना परवानगी नाही, मुंबई महापालिकेचा निर्णय
शिवसेना (Shiv Sena) आणि दसरा मेळावा (Dussehra Melava 2022) अशी वर्षानुवर्षांची परंपरा राहिली आहे.
मुंबई महापालिकेने (BMC) यंदा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क (Shivaji Park) कोणालाच न देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना (Shiv Sena) आणि दसरा मेळावा (Dussehra Melava 2022) अशी वर्षानुवर्षांची परंपरा राहिली आहे. परंतू, यंदा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) अशा दोघांनी मागणी केली. त्यामुळे मुंबई महापालिकेने कोणालाच परवानगी दिली नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परवानगी नाकारल्याचे महापालिकेने म्हटले आहे. दरम्यान, महापालिकेने परवानगी देण्यास केलेल्या विलंबावरुन शिवसेनेने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी देण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबई पोलिसांकडून अभिप्राय मागवला होता. कायदा व सुव्यवस्था या दृष्टीने पाहता शिवाजी पार्कवर कोणत्याच गटाला मेळावा घेण्यासाठी वातावरण अनुकूल नसल्याचा अभिप्राय मुंबई पोलिसांनी दिल्याचे समजते. याच अभिप्रायाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांना शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास परवानगी नाकारण्यात आल्याचे समजते. (हेही वाचा, Shiv Sena Dasara Melava: 'शिवाजी पार्क' मैदानात 'दसरा मेळावा', पण कुणाचा? उद्धव ठाकरे की आणखी कोण? मुंबई हायकोर्टात आज फैसला)
महापालिकेने नाकारलेल्या परवानगीवरुन राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहेत. दुसऱ्या बाजूला शिवसेनेनं उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे गटाला बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली आहे. तरीही ते शिवाजी पार्क मैदानासाठी परवानगी मागत आहेत. पालिका प्रशासन आणि मुंबई पोलीस दबावाला बळी पडणार नाही. कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे काला जात आहे. त्याच आधारावर परवानगी नाकारली जात आहे. आम्ही न्यायालयात पोहोचलो आहोत. न्यायालय जो काही निर्णय देईल तो आम्ही स्वीकारु, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.