BMC Covid Centers Scam: सुजीत पाटकर, डॉ. किशोर बिसुरे यांना ईडीकडून अटक

या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीकडे तक्रारीही करण्यात आल्या. या प्रकरणात ईडीने पहिली मोठी कारवाई केली आहे. लाईफलाईन मॅनेजमेंट सर्विसेसचे सुजीत पाटकर यांना अटक झाली आहे. पाटकर हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात.

Arrested | (File Image)

Sujit Patkar Arrested By ED: मुंबईतील कथित कोविड घोटाळा प्रकरणी ईडीने लाईफलाईन मॅनेजमेंट सर्विसेसचे सुजीत पाटकर आणि बीकेसी कोवीड सेंटर्सची जबाबादरी असलेल्या डॉक्टर किशोर बिसुरे (Kishore Bisure) यांना ईडीने आज (20 जुलै) अटक केली. पाटकर हे शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या अटकेमुळे राऊत यांच्यासह महाविकासआघाडीला धक्का बसल्याचे मानले जात आहे.

कोविड काळात मुंबई महापालिका परिक्षेत्रात उभारण्यात आलेल्या अनेक कोविड सेंटर्समध्ये कधीतरित्या घोटाळा झाल्याचा आरोप, मनसे नेते संदीप देशपांडे आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी केला होता. एका अश्लिल चित्रफितीप्रकरणी नुकतेच चर्चेत आलेल्या भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत.

किरीट सोमय्या यांच्याकडून गंभीर आरोप

किरीट सोमय्या यांनी मुंबईतील कोविड सेंटर्समधील कथीत भ्रष्टाचारावरुन तत्कालीन महापैर किशोरी पेडणेकर, बीएमसी आयुक्त इक्बालसिंह चहल, संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही आरोप केले होते. या सर्वांचाच या घोटाळ्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असल्याचे आरोप ते जाहीररित्या करत होते.

मुंबई महापालिका वरिष्ठ अधिकारीही ईडीच्या रडारवर

दरम्यान, ईडीने आज कारवाई करत दोघांना अटक केली असली तरी मुंबई महापालिकेतील अनेक अधिकारी ईडीच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे. कोविड काळात या अधिकाऱ्यांनी सामग्री खरेदी-विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर केली. पाच कोविड सेंटर्ससाठी एकाच कंपनीला 13 वेळा कंत्राट देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे आगामी काळात ईडी अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई करु शकते.