BMC Budget 2020: मुंबई महापालिकेचा 33 हजार 441.02 कोटींचा अर्थसंकल्प सादर
महापालिकेच्या महसुलात मोठी घसरण झाल्यामुळे या वर्षीच्या अर्थसंकल्पात थोडा बदल पाहायला मिळला आहे.
मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण सिंह परदेशी यांनी मंगळवारी मुंबई महापालिकेचा 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे सादर केला. महापालिकेच्या महसुलात मोठी घसरण झाल्यामुळे या वर्षीच्या अर्थसंकल्पात थोडा बदल पाहायला मिळला आहे. यावर्षी एकूण 33 हजार 441.01 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. तर, 6.52 कोटी शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. 2019-20 तुलनेत यावर्षीच्या अर्थसंकल्पात 9 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तसेच या वर्षीच्या अर्थसंकल्पात रस्ते, रस्ते टिकाऊपणा, पूल, बेस्ट, आपात्कालीन विभाग, आरोग्य विभाग, नैसर्गिक आणि पुरातत्व, पाणी पुरवठा, हरित मुंबई, आगीच्या धोक्यापासून मुक्त मुंबई, अशा महत्वाच्या मुद्द्यावर भर देण्यात आली आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतकार्यात सामील झालेल्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस रूपात भेट, आयुक्त प्रवीण परदेशी यांचा निर्णय
1) पूल-
मुंबई महापालिका अर्थसंकल्प 2020-21 मध्ये पूलांसाठी 799.65 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर, 47 मोठ्या पूलांची दुरूस्ती आणि 184 किरकोळ पूल दुरूस्त करण्यात येणार आहेत.
2) बेस्ट-
बेस्ट साठी कमी केलेल्या दरामुळे 10 टक्क्यांपेक्षा जास्त प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. मुंबई महापालिका अर्थसंकल्प 2020-21 मध्ये 1941.31 कोटींचे अनुदान बेस्ट उपक्रमातील सध्याच्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी दिले होते. या वर्षीसाठी 1500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
3) आपत्कालीन विभाग-
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आपात्कालीन विभागासाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
4) आरोग्य विभाग-
यावर्षी अर्थसंकल्पात 14 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आरोग्य विभागासाठी एकूण 4 हजार 260 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सध्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून या व्हायरसचा धोका मुंबईला होऊ शकतो, याकरीता महापालिकेचे कस्तुरबा रूग्णालयालात 2 कोटींचा निधी देण्यात येणार आहे.
5) नैसर्गिक आणि पुरातत्व-
नैसर्गिक आणि पुरातत्वसाठी 183.30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वीरमाता जीजाबाई भोसले उद्यानसाठी 2 कोटी रूपयांची निधी देण्यात आली आहे. मुंबई शहरातील चौपाट्या आणि समुद्र किनाऱ्यांची सुधारणा व माहीम, वांद्रे, सायन आणि वरळी किल्यांच्या पुनर्स्थापनेची कामे हाती घेतली जाणार आहे. आपत्ती मुक्त मुंबई पुरसदृश परिस्थिती कमी करणे आणि पर्जन्य जलवाहिनी मध्ये सुधारणा यसाठी 5 कोटींचा निधी मिळाला आहे.
6) पाणी पुरवठा-
पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी गारगाई प्रकल्प विकसित करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. यासाठी एकूण 503.51 कोटी तरतूद करण्यात आली आहे.
7) हरित मुंबई-
मुंबईतील वृक्षांच्या संख्येत वाढ करण्यासाठी तसेच दाट शहरी वनीकरण प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तसेच मियावकी पद्धतीने 4 लाख झाडांची लागवड केली जाणार आहे. मुंबई महापालिकेने उद्यान खात्यासाठी 226.77 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
8) आगीच्या धोक्यापासून मुक्त मुंबई-
कमला मिल येथील आगीच्या दुर्घटनेनंतर सत्यशोधक समितीच्या शिफारशीनुसार, महापालिकेच्या २४ विभागामध्ये स्वतंत्र अग्निसुरक्षा पालन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. परिणामकारक हा प्रतिबंधक कारवाई नियमांचे सक्त अनुपालन आणि इमारतीचे वेळोवेळी निरीक्षण यामुळे आधीच्या घटनांमध्ये 2018 साली 52 असलेली संख्या 2019 मध्ये 24 झाली आहे.
9) शिक्षण विभाग-
महापालिकेच्या शिक्षण विभागाने जवळपास 2 हजार 944.59 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
महापालिका आयुक्त अयोज मेहता यांनी गेल्या वर्षी 30 हजार 692. 51 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळीही मालमत्ता कर आणि विकास नियोजन खात्याच्या महसुलात घट झाली होती.