Covid-19 Vaccination In Mumbai: मार्च मध्ये सुरु होणाऱ्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात दररोज 50 हजार लाभार्थींना लस देण्याचे BMC चे लक्ष्य
100 लसीकरण केंद्रे उभारल्यास दरदिवशी आम्ही 20,000 लसीचे डोस देऊ शकू आणि दोन शिफ्टमध्ये काम केल्यास 50,000 डोस देणे सुद्धा शक्य होईल, असे काकाणी म्हणाले.
मार्च महिन्यापासून कोविड-19 लसीकरणाचा (Covid-19 Vaccination) तिसरा टप्पा सुरु होत असून यात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे. दरम्यान, दरदिवशी 20,000 ते 50,000 मुंबईकरांना कोविड-19 लस देण्याचे पालिकेचे (BMC) लक्ष्य आहे. मात्र यासाठी अधिकाधिक कोविड-19 लसीकरण केंद्रांची गरज असल्याची माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबई मिररने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात मुंबईमध्ये 60 वर्षावरील सुमारे 10 लाख नागरिकांना लस देण्यात येईल. तर 45 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या नागरिकांचा आकडा अद्याप स्पष्ट करण्यात आलेला नाही. (Covid-19 Vaccination in India: 1 मार्चपासून सुरु होणाऱ्या कोविड-19 लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन कसे कराल? जाणून घ्या)
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 100 हून अधिक लसीकरण केंद्र उभारण्याचा आरोग्य विभागाचे लक्ष्य असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. 100 लसीकरण केंद्रे उभारल्यास दरदिवशी आम्ही 20,000 लसीचे डोस देऊ शकू आणि दोन शिफ्टमध्ये काम केल्यास 50,000 डोस देणे सुद्धा शक्य होईल, असे काकाणी म्हणाले. केंद्राने 25-30 रुग्णालयांच्या नावांची यादी बीएमसीकडे सुपूर्त केली आहे. या हॉस्पिटलचे लसीकरण केंद्रामध्ये रुपांतर करता येऊ शकते. मात्र तत्पूर्वी त्या रुग्णालयांची पालिकेकडून पडताळणी केली जाईल, असे काकाणी यांनी सांगितले. दरम्यान, सरकारी आणि खाजगी रुग्णालये मिळून सध्या 37 लसीकरण केंद्र सज्ज आहेत. याच केंद्रात आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्संना लस देण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 800 हून अधिक लसीकरण केंद्रे असल्याची माहिती राज्य लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिली. गरज भासल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रुपांतर लसीकरण केंद्रात करता येईल. त्यामुळे लसीकरण केंद्राची एकूण संख्या 1800 इतकी होईल.
दरम्यान, आतापर्यंत लसीकरणाच्या पहिल्या दोन टप्प्यात मुंबईत एकूण 2 लाख लोकांना कोविड-19 लस देण्यात आली आहे. तर राज्यात एकूण 11.4 लाख जणांना लस दिली आहे.