'भाजपाच्या आणखी एका लढ्याला यश'; गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षाने अधिकृत ट्विटर पेजवर केले 'हे' खास ट्विट
"जबाबदार विरोधी पक्षापुढे सरकार नमले" असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंह (Param Bir Singh Letter Bomb) यांच्या लेटरबॉम्ब नंतर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षनेते म्हणून भाजपाने उचलून धरली होती. त्यानंतर आज गृहमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर, "भाजपाच्या आणखी एका लढ्याला यश मिळाले" अशी प्रतिक्रिया भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर पेजद्वारे दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी अनिल देशमुखांचे राजीनामा पत्र देखील पोस्ट केले आहे. "जबाबदार विरोधी पक्षापुढे सरकार नमले" असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
गृहमंत्री देशमुखांचा राजीनामा या मथळ्याखाली महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटरवरुन एक फोटो शेअर करण्यात आलाय. या फोटोच्या खाली, 'भाजपाच्या आणखी एका लढ्याला यश' आणि 'जबाबदार विरोधी पक्षापुढे सरकार नमले' अशी वाक्य लिहिण्यात आली आहेत. तसेच हा फोटो शेअर करताना, "अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावाच लागला. गृहमंत्रीच वसुलीचं टार्गेट देतात, हे आरोप झाल्यावरही देशमुख खुर्चीला चिकटूनच होते. भाजपाने एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून या प्रकरणी दिलेल्या लढ्याला यश आलं," असंही महाराष्ट्र भाजपाने म्हटलं आहे.हेदेखील वाचा- Anil Deshmukh यांनी दिला महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा;CBI चौकशीच्या आदेशानंतर नैतिकदृष्ट्या पदापासून दूर जाण्याचा निर्णय
अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी "या सरकारकडे नैतिकता शिल्लक आहे का हे विचारावं लागेल," असे पत्रकार परिषदेत म्हणाले. हा राजीनामा झाला असला तरी अजूनही एका गोष्टीचं कोडं मला पडलं आहे. इतक्या भयावह घटना राज्यात झाले. कधी नव्हे तेवढे आरोप मंत्र्यांवर लागले. मात्र, अजूनही मुख्यमंत्री अजूनही बोलत नाहीतेय. अजूनही मुख्यमंत्री शांत आहेत. हे अस्वस्थ करणारं आहे. त्यांची प्रतिक्रिया यायला हवी होती. असेही ते पुढे म्हणाले.
अनिल देशमुख यांनी आज गृहमंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना देऊन "CBI चौकशी होईपर्यंत या पदावर नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत: या पदापासून दूर होण्याचा निर्णय घेत आहे." असे त्यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. तसेच "मला गृहमंत्रीपदावरून कार्यमुक्त करावे" असेही ते या पत्रात म्हणाले.