Jalgaon: भाजप खासदार रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात व्यासपीठावरच खडाजंगी

सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम पार पडणार होता.

Raksha Khadse | (Photo Credits: Facebook)

भाजप (BJP) खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) आणि शिवसेना (Shiv Sena) आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात व्यासपीठावरच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. निमित्त होते बोदवड येथील सीसीआय केंद्राच्या उद्धाटनाचे आणि कापूस खरेदी शुभारंभ कार्यक्रमाचे. दोन्ही नेते एकमेकांचे कट्टर विरोधक असल्याने हा सामना काहीसा अधिकच रंगला. रक्षा खडसे या रावेल लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून प्रतिनिधीत्व करतात. तर चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाकडून प्रतिनिधीत्व करतात.

बोदवड येथील सीआाय केंद्र उद्घाटन आणि कापूस खेरीद शुभारंभ करण्यासाठी आयोजित कार्यक्रमास खासदार खडसे आणि आमदार पाटील या दोघांनाही निमंत्रण होते. सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम पार पडणार होता. दरम्यान, कार्यक्रमाच्या नियोजित वेळेत पोहोचण्यास आमदार चंद्रकांत पाटील यांना काहीसा विलंब झाला. तोपर्यंत आयोजकांनी खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करुन घेतले.

दरम्यान, कार्यक्रमास काहीसे उशीराने दाखल झालेल्या आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपला राग व्यक्त केला. उद्घाटन कार्यक्रमास काही वेळ थांबता आले नाही का? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. त्याला रक्षा खडसे यांनी उत्तर देताना म्हटले की, कार्यक्रमाची वेळी सकाळी 10 वाजताची होती. आपली वाट पाहूनच कार्यक्रम घेण्यात आला असे स्पष्ट केले. यावर मला आगोदरच सांगितले असते तर कार्यक्रम तुम्हीच घेतला असता असे म्हणत आमदार चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावत आपला संताप व्यक्त केला. (हेही वाचा, BJP MLA Prashant Bamb: भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, साखर कारखाना सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप)

दरम्यान, रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील वादविवाद हे केवळ निमित्त आहे. असे असले तरी या वादास एकनाथ खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील यांच्याती संघर्षाची किनार आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये असल्यापासूनचा हा संघर्ष आहे. चंद्रकांत पाटील हे कट्टर शिवसैनिक आणि कट्टर एकनाथ खडसे विरोधक मानले जातात. गेली अनेक वर्षे हा संघर्ष सुरु आहे. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे मुक्ताईनगर मतदारसंघातून भाजप तिकीटावर उभ्या होत्या. चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा पराभव केला. तेव्हापासून हा संघर्ष काहीसा अधिकच वाढला आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेनेसोबत महाविकासआघाडी करुन सत्तेत आहे. त्यामु्ळे खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावेळी विश्वासात घेतले गेल्याने चंद्रकांत पाटील हे नाराज असल्याची चर्चा आहे.