Pritam Munde On Urmila Matondkar: ऊर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशावर भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

दरम्यान, राजकारणातून दूर राहिल्यानंतर वर्षभरानंतर त्या पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याचे दिसत आहे.

Pritam Munde, Urmila Matondkar (Photo Credit: Facebook)

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) उद्या म्हणजेच बुधवारी (1 डिसेंबर) शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, राजकारणातून दूर राहिल्यानंतर वर्षभरानंतर त्या पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याचे दिसत आहे. उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशावर भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'ऊर्मिला मातोंडकर या शिवसेनेत प्रवेश करणार आहे, असे ऐकले आहे. मातोंडकर यांना माझ्या शुभेच्छा आहे. त्यांनी याआधी काँग्रेसकडून नशीब आजमावले त्यात त्यांना अपयश आले होते. आता बघू त्यांचे नशीब बदलते की शिवसेनेचे नशीब बदलते? असे प्रीतम मुंडे म्हणाल्या आहेत.

प्रीतम मुंडे यांनी आज जालन्यामध्ये पत्रकार परिषद घेतली होती. दरम्यान, त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. त्यावेळी त्या म्हणाल्या की, कुठल्याच बाबतीत हे सरकार चांगले काम करताना दिसत नाही. त्यामुळे त्यांची वर्षपूर्ती ही जनतेच्या निराशेची वर्षपूर्ती आहे” अशी टीका प्रितम मुंडे यांनी केली आहे. तसेच 'महिला,विद्यार्थी, तरुण, मजूर कोणत्याच घटकाला न्याय देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे लवकरच सरकार जिथून आले तिथे परत जाणार आहे, असे भाकीत प्रीतम मुंडे यांनी वर्तवले आहे. हे देखील वाचा- Anil Parab Criticizes on BJP: 'त्यांना पाच वर्ष दुसरे काम नाही' शिवसेना नेते अनिल परब यांचा विरोधकांना टोला

प्रीतम मुंडे यांचे ट्विट-

महाविकास आघाडी सरकारला एकवर्ष पूर्ण झाले.या काळात सर्वच घटकांचे प्रश्न सोडविण्यास सरकारला अपयश आले.राज्यातील समस्या आणि सरकारचे अपयश जनतेसमोर मांडणे आमचे कर्तव्य आहे. महाविकास आघाडी सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरत आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळाली नाही,महिला सुरक्षेचा विषय दिवसेंदिवस गंभीर होतो आहे.कोरोनाच्या संकटात उपाययोजना करण्याच्या बाबतीत देखील सरकार निष्क्रिय ठरले आहे, असेही प्रीतम मुंडे म्हणाल्या आहेत

उर्मिला मातोंडकर यांनी 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करत उर्मिला मातोंडकरने उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले होते. मात्र, त्यांना भाजपाच्या गोपाळ शेट्टींकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वादावर तोंडसुख घेत उर्मिलाने अवघ्या सहा महिन्यात पक्षाला रामराम ठोकला होता. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकरचे नाव देण्यात आले आहे. यानंतर त्या उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.