BJP-MNS Alliance: भाजप-मनसे युतीबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव नाही; Chandrakant Patil यांनी केले स्पष्ट
यापूर्वीच, मनसे नेते राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत आगामी बीएमसी निवडणुकीत पक्ष एकट्याने उतरणार असल्याचे जाहीर केले होते.
महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मंगळवारी सांगितले की, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी (Maharashtra Navnirman Sena) युती करण्याचा कोणताही प्रस्ताव भाजपच्या विचाराधीन नव्हता आणि जर काही प्रस्ताव असेल तर तो प्रथम 13 सदस्यांच्या कोअर कमिटीसमोर यावा लागतो, जी सखोल विचारविनिमय करून अंतिम निर्णय घेते. परंतु आतापर्यंत असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही.
भाजप आणि मनसे यांच्यातील वाढते सौहार्द आणि भाजपचे अनेक नेते आणि राज ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या भेटींच्या पार्श्वभूमीवर भाजप व मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागल्या आहेत. त्यानंतर आता पाटील यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या शिवाजी पार्कच्या एका कार्यक्रमाला देखील हजेरी लावली होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई विभागाचे प्रमुख आशिष शेलार आणि अन्य पक्षाच्या नेत्यांनी नुकतीच मनसे अध्यक्षांची भेट घेतली होती. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार रुतुजा लटके यांच्या विरोधात भाजपने माघार घेतल्याबद्दल राज ठाकरे यांनी फडणवीस यांचे विशेष आभार मानले. या जागेवर भाजपने माघार घ्यावी अशी विनंती राज ठाकरेंनी फडणवीस यांना केली होती.
राज ठाकरे यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सांगितले आहे. यापूर्वीच, मनसे नेते राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत आगामी बीएमसी निवडणुकीत पक्ष एकट्याने उतरणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, पाटील यांनी या वर्षी जानेवारी महिन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून मनसेसोबत युती करण्याची शक्यता नाकारली होती. परंतु हिंदुत्वाचा मार्ग मनसेला राजकीयदृष्ट्या मदत करेल, असे त्यांनी नमूद केले होते.