Ganesh Naik: भाजप आमदार गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला

महिलेवरील बलात्कार प्रकरणात गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला.

Ganesh Naik | (Photo: Facebook)

भाजप (BJP) आमदार आणि नवी मुंबईतील मोठे नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांना ठाणे सत्र न्यायालयाने (Thane Sessions Court) दणका दिला आहे. महिलेवरील बलात्कार प्रकरणात गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला. त्यामुळे नाईक यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार कायम आहे. महिलेवरील अत्याचार प्रकरणी नाईक यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल आहे. त्यामुळे येत्या 27 (एप्रील) तारखेला त्यांच्यावरील दोन्ही गुन्ह्यांची चौकशी एकत्र होणार आहे.

गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्याविरोधात नवी मुंबई येथील सीबीडी बेलापूर पोलीस स्टेशनमध्ये (CBD Belapur Police Station) एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल आहे. गणेश नाईक यांनी आपल्यावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, 1993 पासून लग्नाचे आमिष दाखवत ते सातत्याने आपले लैंगिक शोषण करीत असल्याचा आरोप या महिलेने तक्रीरत केली आहे. राज्य महिला आयोगानेही (Maharashtra State Commission for Woman) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.   (हेही वाचा, नवी मुंबईच्या गणेश नाईक यांच्या नावे आहे एक वेगळाच विक्रम; जाणून घ्या कोणता)

महिलेने केलेल्या आरोपानुसार, सदर महिला व गणेश नाईक हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात आहेत. या संबंधातून त्यांना एक 15 वर्षांचा मुलगाही आहे. त्यामुळे पीडिता जेव्हा गणेश नाईक यांच्याकडे लग्न करण्याबाबत विचारणा करत असे तेव्हा ते तिला जीवे मारण्याची धमकी देत. पीडितेने नाईक यांच्याकडे वैवाहीक अधिकार मागीतले या वेळी त्यांनी तिला तिच्या मुलासह जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही महिलेने म्हटले आहे.