Ganesh Naik : भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात बेलापूर पोलिसांत गुन्हा दाखल

एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे

Ganesh Naik | (Photo: Facebook)

भाजप (BJP) आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्याविरोधात नवी मुंबई येथील सीबीडी बेलापूर पोलीस स्टेशनमध्ये (CBD Belapur Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गणेश नाईक यांनी आपल्यावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, 1993 पासून लग्नाचे आमिष दाखवत ते सातत्याने आपले लैंगिक शोषण करीत असल्याचा आरोप या महिलेने तक्रीरत केला आहे. राज्य महिला आयोगानेही (Maharashtra State Commission for Woman) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

महिलेने केलेल्या आरोपानुसार, सदर महिला व गणेश नाईक हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात आहेत. या संबंधातून त्यांना एक 15 वर्षांचा मुलगाही आहे. त्यामुळे पीडिता जेव्हा गणेश नाईक यांच्याकडे लग्न करण्याबाबत विचारणा करत असे तेव्हा ते तिला जीवे मारण्याची धमकी देत. पीडितेने नाईक यांच्याकडे वैवाहीक अधिकार मागीतले या वेळी त्यांनी तिला तिच्या मुलासह जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही महिलेने म्हटले आहे. (हेही वाचा, नवी मुंबईच्या गणेश नाईक यांच्या नावे आहे एक वेगळाच विक्रम; जाणून घ्या कोणता)

दरम्यान, संदीप नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक हेदेखील संबंधित महिलेने गणेश नाईक यांच्यासोबत असलेले संबंध संपवून इतर ठिकाणी निघून जावे यासाठी सातत्याने त्रास आणि धमक्या देत असत. नाईक कुटुंबीयांच्या त्रासाबद्दल नेरुळ पोलीस स्थानकात वारंवार तक्रार देऊनही कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी पीडितेने राज्य महिला आयोगाकडे केली होती. पीडितेने राज्य महिला आयोगाकडे केल्या अर्जामध्ये भारतीय दंड विधान 376, 420, 504, 505 अन्वये गुन्हा नोंद करुन पोलिसांकरवी संरक्षण उपलब्ध करुन द्यावे, अशी विनंती केली आहे.