भाजप नेते निलेश राणे यांना कोरोना विषाणूची लागण; तब्येत व्यवस्थित असून, क्वारंटाईन मध्ये असल्याची दिली माहिती
अनेक सेलेब्ज, विविध क्षेत्रातील अनेक मंडळी या आजाराला बळी पडली आहेत. राज्यातील अनेक नेते मंडळींनाही या विषाणूने ग्रासले आहे.
गेल्या चार-साडेचार महिन्यांमध्ये कोरोना विषाणूने (Coronavirus) भारतामध्ये चांगलेच थैमान घातले आहे. अनेक सेलेब्ज, विविध क्षेत्रातील अनेक मंडळी या आजाराला बळी पडली आहेत. राज्यातील अनेक नेते मंडळींनाही या विषाणूने ग्रासले आहे. आता माहिती मिळत आहे की, भाजप नेते निलेश राणे (BJP Leader Nilesh Rane) यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः निलेश राणे यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. सध्या त्यांची तब्येत व्यवस्थित असून, स्वतःला त्यांनी क्वारंटाईन मध्ये ठेवल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत आपल्या ट्वीटमध्ये निलेश राणे म्हणतात, ‘कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी.’
निलेश राणे ट्वीट -
दरम्यान, गेले अनेक दिवस निलेश राणे हे महाविकास आघाडी व मुख्यत्वे शिवसेनेवर आपल्या ट्वीटच्या माध्यमातून हल्लाबोल करत आहेत. कालच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या फोटोवर, ‘झेंडा माघे मग सल्यूट कोणाला मारतायत मुख्यमंत्री... समोर CBI दिसली की काय???’, अशी खोचक टीका केली होती. तसेच याआधी रत्नागिरीत कोविडसाठी तयार केलेल्या युनिटमध्ये रुग्णांना भरती करून घेतले जात नाही, याबाबतही त्यांनी ट्वीच्या माधमातून तक्रार केली होती. (हेही वाचा: नागपूरात कोविड रुग्णांसाठी मानकापूर येथे 1 हजार बेडचं जम्बो रुग्णालय; डॉ. नितीन राऊत यांची माहिती)
याआधी खासदार नवनीत राणा व कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची आली होती. आता नवनीत राणा यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्या म्हणतात. ‘आज मला ICU मधून सामान्य कक्षात स्थलांतर करण्यात आले आहे, आता माझी प्रकृति थोड़ी स्थिर आहे. आपण सर्वांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे, मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार.’