'महाविकास आघाडी सरकार आणि हिंदू धर्माचा काहीही संबंध शिल्लक नाही'; मंदिरं खुली करण्याच्या श्रेयवादावरुन निलेश राणे यांची टीका

सध्या धार्मिक स्थळे खुली करण्याच्या श्रेयावरुन वाद सुरु आहे. कोविड-19 संकटामुळे बंद असलेली राज्यातील धार्मिक स्थळे दिवाळी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर उघडण्यात आली.

Nilesh Rane | (File Image)

राज्यातील राजकीय वातावरण तापण्यासाठी सध्याच्या काळात एखादा मुद्दाही पुरेसा आहे. सध्या धार्मिक स्थळे खुली करण्याच्या श्रेयावरुन वाद सुरु आहे. कोविड-19 संकटामुळे बंद असलेली राज्यातील धार्मिक स्थळे दिवाळी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर उघडण्यात आली. या निर्णयानंतर भाजपने राज्यात ठिकठिकाणी जल्लोष केला. तसंच भाजपामुळे सरकारने मंदिरं उघडली, असे बोलून श्रेयही लाटण्याचा प्रयत्न काही नेत्यांनी केला. दरम्यान, यावर आता भाजपा नेते निलेश राणे (BJP Leader Nilesh Rane) यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. मुळात महाविकास आघाडी सरकारचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध शिल्लक राहिलेला नसल्याचे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "मंदिर उघडल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी आजचा दिवस उत्साहात साजरा केला. काही महाविकास आघाडी सरकारचे रिकामटेकडे टीका करू लागले की बीजेपी ने श्रेय घेऊ नये. मुळात महाविकास आघाडी सरकारचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध शिल्लक राहिलेला नाही." ('मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले' बीड घटनेनंतर भाजप नेते निलेश राणे यांची टीका)

निलेश राणे ट्विट:

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निलेश राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. "आम्हाला कोणत्याही पक्षाकडून हिंदुत्व प्रमाणपत्र मिळण्याची गरज नाही. आम्ही हिंदुत्ववादी होतो, आहोत आणि सदैव असू. आम्ही त्यांच्यासारखे हिंदुत्ववादी राजकारण खेळत नाही. जेव्हा जेव्हा देशाला आपली गरज असेल, तेव्हा हिंदुत्वाची तलवार ठेवून शिवसेना नेहमी पुढे येईल," असे राऊत म्हणाले.

दरम्यान, मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावरुन भाजपने यापूर्वी देखील वारंवार महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. इतकंच नाही तर यावरुन भाजपनं आंदोलनंही छेडलं होतं. मात्र मंदिरं खुली केल्यानंतर भाजपने श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर पंतप्रधान मोदींच्या आदेशावरुनच मंदिरं बंद होती असा पलटवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. तसंच मंदिर उघडण्याचं श्रेय मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचं असल्याचंही ते म्हणाले होते.