Politics of Maharashtra: राज्यात लवकरच सत्ताबदल, शिवसेनेचे 12 आमदार संपर्कात; भाजप नेते बबनराव लोणीकर यांचा दावा
शिवसेना (Shiv Sena) पक्षातील 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे लोणीकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यात सत्ता बदल होणार का? याबाबत पुन्हा केवळ चर्चा सुरु झाली आहे.
राज्यातील महाविकासआघाडी सरकार आज कोसळेल, उद्या कोसळेल असे भाजप नेते छातीठोकपणे सांगत होते. अनेकांनी तर मुहूर्तही दिले. परंतू सरकार काही अद्याप तरी कोसळले नाही. अखेर हे सरकार अंतर्विरोधाने कोसळेल असे भाजप नेते सांगत आहेत. दरम्यान, भाजप नेते बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी आता नवा दावा केला आहे. शिवसेना (Shiv Sena) पक्षातील 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे लोणीकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यात सत्ता बदल होणार का? याबाबत पुन्हा केवळ चर्चा सुरु झाली आहे.
राज्यात नुकत्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पार पडल्या. यात महाविकासआघाडीच्या एकूण जागा वाढल्या असल्या तरी भाजपलाही मोठे यश मिळाले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजप पुन्हा बाजी मारणार का? याबाबत उत्सुकता आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर बोलोली विधानसभेसाठी पोटनिवडणूक लागत आहे. या निवडणुकीत भाजपने सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली आहे. साबणे यांच्या समर्थनार्थ आयोजित रॅलीमध्ये लोणीकर यांनी हा दावा केला. (हेही वाचा, जालना: शेतकऱ्यांच्या मोर्चाला गर्दीसाठी हिरोईन आणू, भाजप नेते बबनराव लोणीकर यांची जाहीर कार्यक्रमात घसरली जीभ)
दरम्यान, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही राज्यात पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चांगले यश मिळाले आहे असे म्हटले. तसेच देगलूर बिलोली मतदार संघातून सुभाष साबणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करुन भारतीय जनता पक्षाच्या पाठिमागे ठामपणे उभा राहण्याचे अवाहनही दानवे यांनी या वेळी केले.
सुभाष साबणे हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. तनुकताच त्यांनी आपल्या काही समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील कार्यकर्ता मेळाव्यात हा पक्ष प्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशावेळीच साबणे यांच्या उमेदवारीची घोषणा करत प्रचाराच्या कामास लागा असे पाटील यांनी म्हटले होते.