'भाजपने महाराष्ट्रात त्यांची कबर खोदलीय, पुढची 25 वर्षे त्यांचे राज्यात सरकार येणार नाही'- Sanjay Raut
ते उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आले आहेत. ते महाराष्ट्राच्या समर्थनार्थ उतरले आहेत. कोणतीही तपास यंत्रणा असो, चूक केली तर महाराष्ट्रातून त्यांना पळून जावे लागेल'
संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीची (ED) कारवाई झाल्यानंतर तीन दिवसांनी त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. यावेळी शिवसेनेने त्यांचे मुंबई विमानतळावर जंगी स्वागत केले. फुलांच्या वर्षावात संजय राऊत यांचे शिवसैनिकांनी मुंबईमध्ये स्वागत केले. अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई करत शिवसेना नेते संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली आहे. अशा स्थितीत संजय राऊत यांनी गुरुवारी मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘ज्यांनी आमच्या आणि महाराष्ट्राविरुद्ध युद्ध पुकारले आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही तयार आहोत.’
ते पुढे म्हणाले, ‘ईडी, एनसीबी आदी केंद्रीय यंत्रणांसमोर महाराष्ट्र उभा राहील आणि त्यांचा सामना करेल. एक वेळ येईल जेव्हा तुम्हाला आमच्यापुढे गुडघे टेकावे लागतील. मला वाटते की ही सुरुवात आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘तपास यंत्रणेमार्फत काय करणार तुम्ही? मला तुरुंगात टाकणार? मला मारणार? मी तयार आहे. आयएनएस विक्रांत घोटाळ्यात किरीट सोमय्या यांना जाब विचारण्याऐवजी भाजपचे लोक त्यांच्या पाठीशी उभे आहेत. देशभक्तीच्या नावाखाली किरीट सोमय्या यांनी देणग्या गोळा करून मनी लाँड्रिंग केले आहे.’
राऊत पुढे म्हणाले की, ‘येथे आलेले हजारो शिवसैनिक माझ्या वैयक्तिक समर्थनार्थ आलेले नाहीत. ते उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आले आहेत. ते महाराष्ट्राच्या समर्थनार्थ उतरले आहेत. कोणतीही तपास यंत्रणा असो, चूक केली तर महाराष्ट्रातून त्यांना पळून जावे लागेल. भाजपने महाराष्ट्रात तर त्यांची कबर खोदलीय. आताच नाही तर पुढची 25 वर्षे महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार नाही.’ यावेळी त्यांनी आपल्याबद्दल शरद पवार यांनी पंतप्रधानांशी चर्चा केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. (हेही वाचा: 'बाप बेटे तुरुंगात जाणार', शिवसेना खासदार संजय राऊत यांचा किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा हल्लाबोल)
दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणेने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अलिबागमधील 8 मालमत्ता आणि दादर, मुंबईतील एक फ्लॅट जप्त केला आहे. प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन्स अँड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी संबंधित एक हजार कोटींहून अधिक रुपयांच्या गोरेगाव पत्र चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 11 कोटींच्या जप्त केलेल्या जमिनीपैकी 9 कोटींची मालमत्ता प्रवीण राऊत यांच्या नावावर असून 2 कोटींची मालमत्ता संजय राऊत यांच्या पत्नीच्या नावावर आहे. या घोटाळ्याबाबत 2018 मध्ये प्रवीण राऊत यांच्या आशिष कन्स्ट्रक्शन्स, राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.