पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याचे मानधन देणार
परिणामी, महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात पूर आणि भूस्खलन सारख्या घटनांमुळे मोठी जीवितहानी झाली असून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra Floods) गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातले आहे. परिणामी, महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात पूर आणि भूस्खलन सारख्या घटनांमुळे मोठी जीवितहानी झाली असून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यातच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील (Pimpri Chinchwad Municipal Corporation) भाजपच्या सर्व नगरसेवकांचे (BJP Corporator) एक महिन्यांचे मानधन पूरग्रस्त भागासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातुन, विविध पातळीवरून मदतकार्य सुरु झाले आहे. तेथील नागरिकांच्या मदतीसाठी स्वच्छता व आरोग्य विषयक उपाययोजनांकरीता पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. याचपार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजप नगरसेवकाचे एक महिन्याचे मानधन पूरग्रस्त भागासाठी देण्याचा निर्णय झाला आहे. यासंदर्भात महापौर उषा ढोरे यांनी माहिती दिली आहे. हे देखील वाचा- Maharashtra Floods: चिपळूण शहर स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी निधी मंजूर
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीची पाहणी करण्याकरिता अनेक राजकीय नेते दौरे करत आहेत. तसेच पूरग्रस्त लोकांना मदत करण्याचे अनेक नेत्यांनी आश्वासन दिले आहे.
चिपळूण येथील पूरग्रस्त भागाचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरा केला होता. त्यावेळी एका पूरग्रस्त महिलेने आक्रोश करत खासदार, आमदारांचे वेतन पूरग्रस्तांसाठी देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला आता प्रतिसाद मिळू लागला असल्याचे दिसून येते.