Mumbai ATM News: मुंबईसह देशभरात एटीएम मशीन फोडून कोट्यवधी रुपये लंपास, चोरांची चलाखी पाहून पोलीसही अवाक

एटीएममधील पैसे लंपास करण्यासाठी चोरट्यांनी वेगवेगळ्या बँकांच्या 872 डेबिट कार्डचा वापर करून अडीच कोटी रुपये लंपास केले. 2,743 वेळा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आले असल्याचे समोर आले आहे.

Mumbai ATM News: मुंबईसह देशभरात एटीएम मशीन फोडून कोट्यवधी रुपये लंपास, चोरांची चलाखी पाहून पोलीसही अवाक
ATM Machine | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Money Control.com)

एटीएम मशीनमधील (ATM Machine) पैसे चोरी केल्याची मोठी घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुंबईतल्या गोरेगावमधील वनराई पोलीस ठाण्यात (Goregaon Vanrai Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशातील 18 राज्यातील 200 एटीएम सेंटरमध्ये मोठी चोरी झाली आहे. एटीएम मशीनमधून दोन दिवसांत तब्बल अडीच कोटी रूपये गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  पोलिसांकडून एटीएममधील पैसे चोरी करणाऱ्यांचा शोध घेत आहे. साम टिव्हीने या घटनेची बातमी दिली आहे.

एटीएम सेंटरचा वीजपुरवठा तात्पुरता खंडीत करून तांत्रिक बिघाड निर्माण करून चोरट्यांनी कोट्यवधी रुपये लंपास केल्याचे समोर आले आहे. हा एटीएम घोटाळा समोर येण्यासाठी तब्बल आठ महिने लागले आहेत. 12 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2022 या दोन दिवसांमध्ये देशभरातील एटीएममधून कोट्यवधी रुपये काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एटीएममधील पैसे लंपास करण्यासाठी चोरट्यांनी वेगवेगळ्या बँकांच्या 872 डेबिट कार्डचा वापर करून अडीच कोटी रुपये लंपास केले. 2,743 वेळा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आले असल्याचे समोर आले आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा चोरीचा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. मेसर्स हिताची पेमेंट्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने एटीएम मशीन तयार करून देशभरात पुरवलले जातात. आता या चोरी प्रकरणी या कंपनीनेच मुंबईतल्या वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एटीएममधील पैसे चोरणाऱ्या या टोळीचा शोध पोलीस घेत आहेत.

एटीएममधून पैसे काढण्यासाठी आरोपी स्वत:चं डेबिट कार्ड वापरुन सामान्य प्रक्रिया सुरु करत असे. त्यानंतर पैसे एटीएम डिस्पेन्सरी शटरपर्यंत पोहोचताच. त्याठिकाणी उपस्थित असलेली दुसरी व्यक्ती त्यावेळी इलेक्ट्रिक वायर ओढून वीजपुरवठा खंडीत करत असे. जेणेकरुन हा तांत्रिक बिघाड असल्याचे भासवले जात होते. त्याचवेळी पहिली व्यक्ती डिस्पेंसिंग शटरमधून पैसे खेचून काढून घ्यायची. तांत्रिक बिघाडामुळे मशीनमध्ये संबंधित व्यवहाराची नोंद होत नाही आणि पैसे पुन्हा ग्राहकाच्या बँक अकाऊंटमध्ये जमा केले जातात. परिणामी यामध्ये कंपनीचे नुकसान होते.अशा प्रकारे या लोकांनी तब्बल दोन कोटी रुपये लंपास केल्याचे समोर आले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2023 01:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).