Bhandara Hospital Fire: भंडारा येथील नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी 2 नर्सवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
भंडारा येथील हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 नर्सविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भंडारा येथील हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 नर्सविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभांगी सातवणे आणि स्मिता आंबिलढके अशी या दोघींची नावं असून त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे तपासाअंती समोर आले आहे. 9 जानेवारी रोजी मध्यरात्री भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या (Bhandara District General Hospital) सिक न्यू बॉन केअर युनिटला (Sick Newborn Care Unit) आग लागली होती. या आगीत होरपळून 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता.
याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, भंडारा येथील नवजात बालक जळीत प्रकरणात 2 नर्सनी निष्काळजीपणा केल्याचे तपासात समोर आले असून त्यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास डीवायएसपी दर्जाचे अधिकारी करत आहेत.
अनिल देशमुख ट्विट:
याप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी भंडारा जिल्हा भाजपतर्फे 15 जानेवारीपासून भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु आहे. दरम्यान, या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bhandara Hospital Fire: भंडारा जिल्हा रुग्णालय दुर्घटनेप्रकरणी पीडित कुटुंबांना पंतप्रधान निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर)
यात डॉक्टर, नर्सेस आणि इतर स्टाफचा देखील समावेश आहे. सिव्हिल सर्जन डॉ प्रमोद खंडाते, वैद्यकीय अधिकारी अर्चना मेश्राम, नर्स इनचार्ज ज्योती भारस्कार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. सुनीता बडे यांची बदली करण्यात आली असून बालरोग तज्ञ सुशील अंबडे, नर्स स्मिता आंबीलडुके आणि शुभांगी साठवणे यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत.