Who is Bhajan Lal Sharma: पहिल्यांदाच आमदार, लागली मुख्यमंत्री पदाची लॉटरी, जाणून घ्या कोण आहेत भजलाल शर्मा

भाजपने शर्मा यांच्या रुपात वसुंधरा राजे यांच्यासह अनेकांना धक्का दिला आहे.

First-Time MLA Bhajan Lal Sharma Named Chief Minister of Rajasthan (Photo Credits: X/@PCMohanMP)

भारतीय जनता पक्षाने (BJP) राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा (Bhajan Lal Sharma) यांची निवड केली आहे. विशेष म्हणजे भजनलाल हे सांगानेर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले आहेत आणि पहिल्या टर्ममध्येच त्यांना मुख्यमंत्री (Chief Minister of Rajasthan) पदाची लॉटरी लागली आहे. वास्तविक पाहता वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांच्यासारख्या माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय पातळीवरही पक्ष संघटनेत काम केलेल्या दावेदाराला बाजूला करुन नेतृत्वाने नवा चेहरा निवडला आहे. त्यामुळे राजे यांच्यासह भाजपमधील अनेक तगड्या दावेदारांनाही केंद्रीय नेतृत्वाने धक्का दिला आहे. अशा स्थितीत नव्या आणि तुलनेने अननुभवी असलेल्या मुख्यमंत्र्यांना शासन, प्रशासनासोबतच राजकीय आघाडीवरही स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. जाणून घ्या कोण आहेत भजनलाल शर्मा.

मुख्यमंत्र्यांचा अनुभव आणि राजकीय कारकीर्द:

भजनलाल शर्मा (वय 56) हे जरी पहिल्यांच टर्ममध्ये मुख्यमंत्री झाले असले तरी, त्यांना पक्ष संघटनेत काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी पक्षाचे राज्य सरचिटणीस म्हणून चार वेळा काम केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना राजस्थानमध्ये मिळवलेले बहुमत त्यांच्यासाठी मोठी संधी घेऊन आले. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा 48,081 मतांच्या प्रभावशाली फरकाने पराभव केला. (हेही वाचा, Rajasthan Chief Minister Candidate: राजस्थान भाजपामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? वसुंधरा राजे अजूनही दावेदार?)

भजनलाल यांची संपत्ती:

निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मुख्यमंत्री शर्मा हे पदव्युत्तर आहेत. त्यांच्याकडे एकूण घोषित संपत्ती दीड कोटी रुपये आहे. यामध्ये 43.6 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आणि 1 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे. मुख्यमंत्री शर्मा यांचे एकूण घोषित उत्पन्न 11.1 लाख रुपये आहे. त्यापैकी 6.9 लाख रुपये स्व-उत्पन्न आहे. (हेही वाचा, Rajasthan New CM: भजनलाल शर्मा होणार राजस्थानचे नवे मुख्यमंत्री, वसुंधरा राजे यांचा पत्ता कट)

वसुंधरा राजे आणि मातब्बरांना धक्का?

दरम्यान, भजनलाल यांची निवड अत्यंत अनपेक्षीत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून प्रामुख्यान वसुंधरा राजे यांच्याकडेच पाहिले जात होते. मात्र, त्यांना पर्याय म्हणून इतरही नावे पुढे येत होती. ज्यामध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत (Gajendra Shekhawat), सतीश पुनिया (Satish Poonia), राज्य भाजप प्रमुख सीपी जोशी (CP Joshi), दिया कुमारी (Diya Kumari सुश्री राजे यांची भाची) आणि राज्याचे 'योगी' बाबा बालक नाथ यांचा यांचीही नावे चर्चेत होती. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत प्रचंड उत्सुकता कायम राहिली होती. दरम्यान, सीपी जोशी आणि सतीश पुनिया यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने केंद्रीय नेतृत्व कोणावर जबाबदारी देते याबाबत प्रचंड उत्सुकता होती. जी आता संपली आहे आणि मातब्बरांना धक्का मिळाला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif