'मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्षा’चा शुभारंभ; '2027 पूर्वी BEST च्या ताफ्यात 100 टक्के Electric Buses असतील'- आदित्य ठाकरे
बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी बेस्टच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक वाहनांची माहिती देऊन 2027 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात खरेदी करण्यात येणाऱ्या संपूर्ण बसेस इलेक्ट्रिक असतील असे नियोजन असल्याचे सांगितले
मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेला ‘मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्ष’ हे क्रांतिकारक पाऊल असून या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी मदत होईल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही केवळ मोहीम न राहता ती सवय बनणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. ‘मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्षा’चा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
वर्ल्ड रिसोर्सेस इंडिया (डब्ल्यूआरआय) संस्थेच्या सहकार्याने या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री ठाकरे म्हणाले, वातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक उपाययोजना करून शाश्वत विकासाकडे राज्यशासनाची वाटचाल सुरू आहे. याच अनुषंगाने राज्याने आपले सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी सुरूवातीला सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्यात आले. आता शासकीय पातळीवर इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे वैयक्तिक पातळीवर या वाहनांचा वापर वाढावा यासाठी चार्जिंग स्थानके वाढविण्यासारख्या पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतुकीअंतर्गत मुंबईत बेस्टच्या ताफ्यात सध्या असलेल्या 386 बसेसमध्ये लवकरच वाढ होऊन 2027 पूर्वी 100 टक्के बसेस इलेक्ट्रिक असतील यासाठी नियोजन करण्यात येत आहे. वातावरणीय बदलांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा उल्लेख करून ठाकरे यांनी कार्बन न्यूट्रलच्या दिशेने जाताना संबंधित सर्वच विभागांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. (हेही वाचा: खाद्य व्यवसाय सुरु करण्याची सुवर्णसंधी; BMC शहरातील 50 ठिकाणी सुरु करणार फूड ट्रक, लवकरच निविदा काढणार)
बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी बेस्टच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक वाहनांची माहिती देऊन 2027 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात खरेदी करण्यात येणाऱ्या संपूर्ण बसेस इलेक्ट्रिक असतील असे नियोजन असल्याचे सांगितले. मुंबई इलेक्ट्रिक व्हेईकल कक्षाच्या माध्यमातून शासकीय अधिकारी, ई-मोबिलिटी तज्ज्ञ, इलेक्ट्रिक व्हेईकल उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधी यांना एकत्र आणण्याचे कार्य केले जाणार आहे.
विद्युत वाहनांच्या प्रचारासाठी निर्णय घेण्यासाठी धोरणकर्त्यांना सहाय्य करणे, मुंबई महानगरात विद्युत वाहन चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, विद्युत वाहनांच्या खरेदीसाठी सुलभरित्या कर्ज सुविधा उपलब्ध करुन देणे, वाहनांमधील बॅटरींसाठी अद्ययावत तंत्रज्ञान अंमलात आणणे, बेस्टच्या सहयोगाने इलेक्ट्रिक बसेसचा ताफा तयार करणे, सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांचे विद्युतीकरण करणे, मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर कामकाज करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रातील नवउद्योजकांना सहाय्य करणे अशी विविध कार्ये या कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)