BDD Chawl: बीडीडी चाळींना राजकीय नेत्यांची नावे, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, राजीव गांधी यांचा समावेश; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची सभागृहात माहिती

म. जोशी बीडीडी चाळीला राजीव गांधी (Rajiv Gandhi) नगर नाव देण्यात आले आहे

MUMBAI | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील बहुचर्चीत बीडीडी चाळींचा (BDD Chawl) चेहरामोहरा बदलण्यासाठी ठाकरे सरकार प्रयत्नशील आहे. आता या चाळींचा पुनर्विकास वेगाने करण्यात येत असून या चाळींचे नामकरणही झाले आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, वरळीतील बीडीडी चाळींना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) नगर, नायगांव येथील बीडीडी चाळीला शरद पवार (Sharad Pawar) नगर आणि ना. म. जोशी बीडीडी चाळीला राजीव गांधी (Rajiv Gandhi) नगर नाव देण्यात आले आहे. त्यामुळे या चाळी आता राजकीय नेत्यांच्या नावाने ओळखल्या जाणार आहेत.

मुंबई शहरातील बीडीडी चाळी सुमारे 100 वर्षांपेक्षाही जुन्या आहेत. प्रामुख्याने कामाठीपुरा या भागातील चाळी या अधिक जुण्या आहेत. त्यामुळे बीडीडी चाळींचा पुनर्विकास कार्यन्वित करण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे. कामाठीपुरा येथील विकास प्रकल्प येत्या तीन महिन्यांमध्ये सुरु होईल. तसे, मुंबईत असलेल्या 50 वर्षांपेक्षा अधिक जुन्या इमारतींचा पुनर्विकास, रखडलेले एसआरए प्रकल्प, मुंबईबाहेरील एसआरए योजना लागू करणे, म्हाडा जमीनींवरील अतिक्रमण हटवणे, धारावी आणि बीडीडी चाळींचा पुनर्विकास यांसारख्या अनेक विषयांवर विधानसभेत चर्चा करण्यात आली. नियम 293 अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या चर्चांना गहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर देताना अनेक घोषणा केल्या. (हेही वाचा, BDD चाळ पुनर्विकासात कोणीही बेघर होणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

शहरातील आणि राज्यातील नागरिकांना निवारा देण्याचे काम म्हाडा करते, असे सांगताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी परळ येथील बॉम्बे डाईंग इमारतीला 100 खोल्या देण्यात आल्या आहेत. म्हाडा जाहीर केल्याप्रमाणे अतिवृष्टीग्रस्त तळीये गावातील नागरिकांना 600 फुटांचे घर देणार आहे. याशिवाय मुंबई येथील जिजामातानगर येथे विद्यार्थ्यांसाठी एक नवे वसतीगृह बांधण्याचा निर्णयही म्हाडाने घेतला आहे, असे आव्हाड म्हणाले.