FASTag देशभरात बंधनकारक पण मुंबई मध्ये Bandra-Worli Sea Link सोबत 5 टोलनाक्यांवर मार्च महिन्यापर्यंत स्वीकरली जाणार रोख रक्कम!

वांद्रा-वरळी सीलिंक सह मुंबई शहरातील पाचही एंट्री पॉईंट्सवर फास्ट टॅग लेन आहेत पण त्यावर कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूने काही काम अद्यापही पूर्ण न झाल्याने तेथे आताच 100% फास्टटॅग लेन करणं शक्य नसल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

FASTag, Toll Plaza | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतामध्ये 15 फेब्रुवारीपासून फास्ट टॅग (FASTag) बंधनकारक झाला असला तरीही मुंबई मध्ये 5 एन्ट्री पॉईंट्स सह वांद्रा-वरळी सी लिंक (Bandra-Worli Sea Link) वर मार्च महिन्यापर्यंत तुम्ही फास्टटॅग ऐवजी पैशांच्या स्वरूपातही टोल भरू शकणार आहात. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार ही मुदतवाढ वांद्रा-वरळी सी लिंक साठी 10 मार्च तर अन्य 5 एन्ट्री पॉईंट्स ज्यामध्ये वाशी (Vashi) , ऐरोली (Airoli), एलबीएस (LBS), दहिसर (Dahisar), मुलुंड (Mulund) यांचा समावेश आहे तेथे 31 मार्च पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई ट्राफिक पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकी स्वारांना फास्ट टॅग नसल्यास दंड आकारला जाणार की नाही याची माहिती देण्यात आलेली नाही. FASTag आता बंधनकारक! कुठे मिळणार फास्ट टॅग, आवश्यक कागदपत्रं कोणती?

परिवहन मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज (16 फेब्रुवारी)पासून ज्या गाड्यांच्या विंडशिल्डवर फास्ट टॅग नसेल त्यांना आता नॅशनल हायवे वर प्रवास करताना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. यामध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वे चा देखील समावेश आहे. पहिल्यांदा दंड म्हणून 300 रूपये तर त्यानंतर 500 रूपये दंड आकारला जाणार आहे.

एमएसआरडीसीचे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर विजय वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रा-वरळी सीलिंक सह मुंबई शहरातील पाचही एंट्री पॉईंट्सवर फास्ट टॅग लेन आहेत पण त्यावर कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूने काही काम अद्यापही पूर्ण न झाल्याने तेथे आताच 100% फास्टटॅग लेन करणं शक्य नसल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. आतादेखील या ठिकाणी केवळ फास्ट टॅग साठी राखीव असलेल्या मार्गिकांवर आलेल्या गाड्यांवर फास्ट टॅग नसेल तर दुप्पट टोल आकारला जातो.

दरम्यान जशी फास्ट टॅगसाठी डेडलाईन जवळ येत आहे तशी लोकांची फास्ट टॅगसाठी अर्ज करण्याला गर्दी वाढली आहे. रविवारी देखील वाशीच्या टोल नाक्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा पहायला मिळाल्या होत्या. अनेक ठिकाणी फास्ट टॅग स्कॅनर्स नीट काम करत नसल्याने रांगा वाढत असल्याचं चित्र आहे.