मुंबई : वांद्रे पूर्व भागातील कलानगर जवळील स्कायवॉक पाडणार; 22,23 जूनला Western Express Highway वर वाहतूकीमध्ये बदल
पुढील काही दिवस तो दुरूस्तीच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबईतील वांद्रे पूर्वे भागात, कलानगर (Kala Nagar) ते वांद्रे स्टेशन (Bandra Station) यांना जोडणारा स्कायवॉक (Skywalk) आता पाडला जाणार आहे. 22 आणि 23 जून दरम्यान हा स्कायवॉक पाडला जाणार असल्याने पश्चिम द्रुतगती मार्गावर (Western Express Highway) वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. 22 आणि 23 जून दिवशी सकाळी 11 ते 5 या वेळात पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.
स्कायवॉक पाडण्याचं काम हाती घेतल्याने यंदाच्या विकेंडला म्हणजेच 22 आणि 23 जून दरम्यान पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. वाहनांना वाकोल्याहून आल्यावर माहिमचा फ्लायओव्हर खुला आहे. त्यामुळे खेरवाडी स्लीप रोड, भास्कर कोर्ट जंक्शन कडून कलानगर जंक्शन आणि धारावीकडे जाण्यासाठी वाहतूक वळवण्यात आली आहे.
माहिम कॉजवे जंक्शन ते कलानगर फ्लायओव्हर हा पश्चिम द्रुतगती मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. वांद्रे वरळी सी लिंकवरून पश्चिम द्रुतगती मार्गावरून वांद्रे रेक्ल्मेशन वरून एस. व्ही. रोडकडे जावं लागणार आहे. दुरूस्तीच्या कामासाठी वांद्रे कोर्टापासून रेल्वेस्थानकापर्यंतचाही स्कायवॉक बंद करण्यात आला होता. पुढील काही दिवस तो दुरूस्तीच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येणार आहे. पादचाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.