बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती; पाच कार्याध्यक्षांचीही निवड, सुशील कुमार शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी

या शर्यतीत हर्षवर्धन पाटील यांचे नावही चर्चेत होते मात्र थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. सोबतच सोबतच पाच कार्याध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे.

Balasaheb Thorat | (Photo Credit: Facebook)

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला (Congress) फार मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. एकीकडे राहुल गांधी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असताना, महाराष्ट्रातही अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा (Maharashtra Congress President) राजीनामा दिला होता. आता  त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. या शर्यतीत हर्षवर्धन पाटील यांचे नावही चर्चेत होते मात्र थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. सोबतच सोबतच पाच कार्याध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे.

राज्यात कॉंग्रेसचा फक्त एकच खासदार निवडून आला आहे. त्यामुळे विधिमंडळ पक्षनेते हे पद आपोआप बाळासाहेब थोरात यांना मिळाले. आता प्रदेशाध्यक्ष पदासाठीही त्यांच्या नावाचा निर्णय झाला आहे. दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या बैठकीत बाळासाहेब थोरात यांच्या नावावर सहमती झाली होती. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, बसवराज पाटील, विश्वजीतक कदम आणि  मुझफ्फर हसन यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. (हेही वाचा: बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी; राधाकृष्ण विखे पाटील यांना शह देण्यासाठी काँग्रेसची खेळी)

कॉंग्रेसने राज्यात एकूण सात समित्यांची स्थापना केली आहे. सर्व समित्यांचे अध्यक्षपद सुशील कुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर प्रचार प्रमुखपदी नाना पटोले यांची नेमणूक करण्यात आली आहे. थोरात यांनी नगर जिल्ह्यातल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग सात वेळा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे. मराठा समाजाचे मातब्बर नेते अशी ओळख असलेले बाळासाहेब कॉंग्रेसचे निष्ठावंत नेते आहेत.