Balasaheb Thackeray 8th Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडणा-या काही खास गोष्टी, जाणून घ्या सविस्तर
अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे दर्शन घडविणा-या बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी काही खास गोष्टी
Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे हे नाव समोर येताच 'असा नेता पुन्हा होणे नाही' असे एकच उद्गगार तोंडातून येईल. ज्या व्यक्तीने दिल्लीचे तख्त देखील हलवून सोडले होते त्या थोर नेत्याने 17 नोव्हेंबर 2012 रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी जनता पोरकी झाली. 'आमचा देव चोरला' असे एकच शब्द बाळासाहेबांच्या लाखो कार्यकर्त्यांच्या, समर्थकांच्या तोंडून आले. या व्यक्तीचे करावे तितके वर्णन कमीच आहे. हुशार, चलाख, तडफदार, कणखर वेळप्रसंगी हळवे देखील होणारा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आजही लोकांच्या मनात घर करुन आहेत. किंबहुना अनेक लोक हे मानायला तयारच नाहीत की ते आपल्यात नाहीत. त्यांच्या आठवणींचा साठा इतका अमूल्य आहे जो कधीच संपणार नाही.
म्हणूनच अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे दर्शन घडविणा-या बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी काही खास गोष्टी
1. प्रबोधनकार ठाकरे यांच्या घराण्यात जन्माला आल्याने बाळासाहेबांना कणखर बाणा आणि विचारसरणी ही कुटुंबाची देणगी लाभली होती.
2. बाळासाहेब ठाकरे यांच्या आडनावाची मूळ इंग्रजी स्पेलिंग ही Thakre अशी होती, मात्र कालांतराने इंग्रजी लेखक William Makepeace Thackeray यांच्या नावानुसार त्यांनी या स्पेलिंगमध्ये बदल करून Thackrey असे आडनाव वापरण्यास सुरुवात केली.
3. बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 साली शिवसेना पक्ष स्थापन केला. त्यांची राजकारणातील भूमिका भूमिपुत्रांच्या हक्कांशी संबंधित कामातून सुरु झाली होती.
4. आपल्या भाषणात बाळासाहेब मराठी भाषेचाच पुरेपूर वापर करत. हास्यविनोद, व्यंग, उपहास, टीका, मिश्लिलता, टोमणे, वाक्यप्रचार, शब्दप्रयोग, अशा सर्व बाबींचा समावश बाळासाहेबांच्या भाषणात असे.हेदेखील वाचा- Balasaheb Thackeray 8th Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवाजी पार्कात लोकांची गर्दी, अत्यंत साधेपणाने स्मृतिदिन साजरा करण्याचा शिवसैनिकांचा निर्णय
5. बाळासाहेब हे पक्षप्रमुख असले तरीही त्यांनी सक्रीय राजकारणात म्हणजे निवडणुकांचा स्वतः सामना केला नाही मात्र महाराष्ट्रासाठी त्यांनी राजकारणामध्ये अनेक चक्र फिरवली, किंबहुना यामुळेच अजूनही राजकीय वर्तुळात शिवसेनेचा दरारा कायम आहे.
6. बाळासाहेब यांनी सामना हे शिवसेना मुखपत्र सुरु केल्यावर त्यांची खुमासदार लेखन शैली प्रकर्षाने समोर आली होती. एका अग्रलेखात त्यांनी मित्रपक्ष भाजपा आणि सेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर सुद्धा निशाणा साधला होता. यावरुन त्यांचा स्पष्ट वक्तेपणा दिसून येतो.
7. बाळासाहेब आणि शिवसेना पक्षावर 1992 सालच्या मुंबईतील दंगलीमध्ये अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप होता. यामध्ये तब्बल 900 जणांचा बळी गेला असल्याने प्रकरण चांगलेच तापले होते. मात्र शेवटपर्यंत या बाबतीत कोणताही आरोप सिद्ध होऊ शकला नाही.
8. आपल्या व्यंगचित्रांमुळे अनेकदा त्यांना राजकीय वादाला सामोरे जावे लागतं. मात्र तरीही त्या सर्वांचा सामना करुन त्यांनी आपले मत मांडणे काही थांबवले नाही.
मराठी माणसाच्या अस्मितेसाठी बाळासाहेब ठाकरे प्रचंड झटले. मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेले त्यांचे शेवटचे भाषण मात्र मनाला चटका लावून गेले. मंत्रालयावर भगवा फडकावा हे त्यांचे स्वप्न होते मात्र ते स्वप्न पूर्ण झालेले पाहण्यास आज ते हवे होते असे अनेकांच्या तोंडून आज उद्गगार निघत आहेत.