Avinash Jadhav Post: वसंत मोरे यांच्या मनसे ला 'जय महाराष्ट्र' नंतर अविनाश जाधव यांची पोस्ट चर्चेत!

राज ठाकरे यांचे ते कट्टर मनसैनिक आहेत.

Avinash Jadhav | FB

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसे पक्षातील पुण्यातील नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी आज पक्षाला रामराम ठोकत आपले राज ठाकरेंशी मतभेद नाहीत पण ज्यांच्या हातात पुण्यातील जबाबदारी देण्यात आली आहे त्यांच्या कात्यपद्धतीवर नाराजी असल्याचं म्हणत वसंत मोरे यांनी राजीनामा दिला आहे. यापूर्वीही वसंत मोरे यांची नाराजी राज ठाकरेंनी दूर करत त्यांना जवळ केले मात्र आज त्यांच्या राजीनाम्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav)यांची पोस्ट वायरल होत आहे. अविनाश जाधव हे मनसेचे ठाणे-पालघर विभागाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कोणाचेही नाव न घेता केलेल्या पोस्टचा नकळत संबंध वसंत मोरे यांच्या एक्झिटशी लावला जात आहे. त्यांनी वसंत मोरेंना कानपिचक्या दिल्या आहेत का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

अविनाश जाधव यांनी पोस्ट मध्ये काही फोटो शेअर केले आहेत. तर कॅप्शनमध्ये

'एक राजा रोज हत्तीवरून राज्यात फेरफटका मारायचा तेव्हा प्रत्येक चौकात राजाचं औक्षण केलं जायचं,आरती ओवाळली जायची,धुमधड्याक्यात स्वागत केलं जायचं. तेव्हा त्या हत्तीला वाटायचं औक्षण-आरती, आपलीच केली जात आहे.त्याला कळत नव्हतं ही राजाची पुण्याई आहे. राजामुळे त्याला हा मान मिळत आहे......' असा संदेश लिहला आहे.

पहा पोस्ट

वसंत मोरे हे राज ठाकरेंचे शिवसेने पासूनचे सोबती आहेत. राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हा वसंत मोरेही त्यांच्यासोबत बाहेर पडले. मागील 28 वर्षांची राज ठाकरेंची साथ सोडताना आज वसंत मोरे भावूक झाले होते. 2007, 2012 मध्ये वसंत मोरे पुणे मनपा मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते. फेब्रुवारी 2021 साली राज ठाकरेंनी त्यांना शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. मात्र नंतर मनसेच्या भोंग्यावरील भूमिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. आता पुण्यातून वसंत मोरे लोकसभेसाठी इच्छूक आहेत. पण पक्षातील सहकारी नकारात्मकतेने पाहत असल्याने मनातील खदखद बोलून दाखवत परतीचा मार्ग आता नाही म्हणत मनसेला वसंत मोरेंनी रामराम ठोकला आहे.