Aurangabad: लसीचा एकही डोस न घेतलेल्या रिक्षा चालकांच्या गाड्या होणार जप्त; औरंगाबाद प्रशासनाचा मोठा निर्णय 

काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने पेट्रोल पंप चालकांना, ज्या लोकांनी लसीचा पहिला डोसही घेतला नाही अशा लोकांना पेट्रोल विकू नये असे निर्देश दिले होते अधिका-यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले की, लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी औरंगाबाद 26 व्या क्रमांकावर आहे

Auto Rickshaw | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

देशभरात कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणावर (Vaccination) विशेष लक्ष दिले जात आहे. राजस्थानसारख्या काही राज्यांमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे नवीन चिंता निर्माण करीत आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी औरंगाबाद प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या रिक्षा चालकांनी कोरोना विषाणू लसीचा पहिला डोसही घेतला नसेल अशा चालकांच्या रिक्षा जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

औरंगाबादचे डीसी सुनील चौहान यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. रुग्णालयांमध्ये लस दिली जात आहे, आता लोकांनी स्वतः पुढे यावे, असे त्यांनी म्हटले आहे. औरंगाबादचे उपायुक्त सुनील यांनी पीएम मोदींसोबत झालेल्या बैठकीत सहभाग घेतला होता. या बैठकीत विशेषत: ज्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची गती मंद आहे, अशा जिल्ह्यांच्या उपायुक्तांना आमंत्रित करण्यात आले होते. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्हा लसीकरणात अत्यंत मागे असल्याने लसीकरण मोहिमेला गती देण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. त्यानंतर प्रशासनाने लसीकरणाला गती देण्यासाठी हा उपाय योजला आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने पेट्रोल पंप चालकांना, ज्या लोकांनी लसीचा पहिला डोसही घेतला नाही अशा लोकांना पेट्रोल विकू नये असे निर्देश दिले होते अधिका-यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले की, लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी औरंगाबाद 26 व्या क्रमांकावर आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण 32,24,677 लोकसंख्येपैकी 64.36 टक्के लोकांना 22 नोव्हेंबरपर्यंत लसीचा पहिला डोस आणि 27.8 टक्के लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. (हेही वाचा: Navi Mumbai: कोरोना चाचणीला नकार दिल्याने नेरळ पोलिसांनी एका व्यक्तीला केली अटक)

दरम्यान, नुकतेच स्वच्छ भारत अभियानात औरंगाबाद महानगरपालिकेचा देशात 22 वा तर महाराष्ट्रात सहावा क्रमांक आला आहे. या यशाबद्दल पालिका प्रशासनाचे कौतुक होत आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये, 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महानगरपालिका राष्ट्रीय स्तरावर 22 व्या क्रमांकावर आहे.