औरंगाबाद मध्ये कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन कडक पाळण्यासाठी पोलिस घेणार तरूणांची मदत; असं असेल स्वरूप!
सध्या 70 कंटेन्मेंट झोनमध्ये कडक लॉकडाऊन पाळणं अनिवार्य झालं आहे.
मुंबई, पुणे पाठोपाठ आता औरंगाबादमध्ये कोरोनाचा धोका वाढत असताना स्थानिक पोलिस शहरात कडक लॉकडाऊन पाळण्यासाठी तरूणांची मदत घेणार आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कडक ठेवत संचारबंदीच्या नियमांचं पालन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान औरंगाबाद शहरामध्ये कोरोना बाधितांचा एकूण आकडा 800 च्या पार गेला आहे. सध्या 70 कंटेन्मेंट झोनमध्ये कडक लॉकडाऊन पाळणं अनिवार्य झालं आहे.
औरंगाबाद पोलिस कमिशनर चिरंजीव प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 5-10 तरूणांचा समावेश असलेली टीम बनवली जाईल. ही टीम कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांची मदत करेल. लहान भागात 5 स्वयंसेवक असतील तर मोठ्या भागामध्ये 10 जणांची टीम काम करेल. यांच्या माध्यमातून नागरिकांना अत्यावश्यक वस्तू, किराणामाल यांचा पुरवठा केला जाणार आहे. तसेच लोकांच्या येण्या-जाण्यावरही लक्ष ठेवणार आहेत. Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात कोविड 19 चे किती रुग्ण? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील कोरोना व्हायरसची स्थिती.
दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबाद, नाशिक, मालेगाव येथे जाऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. दरम्यान 24 मार्च पासून लागू करण्यात लॉकडाऊन महाराष्ट्रासह देशभरात वाढवला जाणार आहे. 18 मे पूर्वी लॉकडाऊनचं नवं स्वरूप नागरिकांना सांगितलं जाईल अशी माहिती काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.