Aurangabad City Police Booked Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबद शहर पोलिसांत गुन्हा दाखल; अटक होण्याची शक्यता
औरंगाबद शहर पोलिसांनी (Aurangabad City Police) विविध आरोपांखाली भारतीय दंड संहिता कलम 116, 117, 153 (अ) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
औरंगाबाद (Aurangabad) येथील सभा प्रकरणी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर कारवाई झाली आहे. औरंगाबद शहर पोलिसांनी (Aurangabad City Police) विविध आरोपांखाली भारतीय दंड संहिता कलम 116, 117, 153 (अ) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चिथावणीखोर भाषण, व्यक्तीगत टीका टिप्पणी आदी आरोप राज ठाकरे यांच्यावर ठेवण्यात आल्याचे समजते. महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांच्या औरंगाबद येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभेला सशर्थ परवानगी दिली होती.
राज ठाकरे यांच्यावर थेट गुन्हा दाखल झाल्यामुळे आता त्यांना अटक केली जाण्याचीही शक्यता आहे. प्रामुख्याने 153 (अ) हे कलम चिथावणीखोर भाषण, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे यांसारख्य कारणांसाठी लावले जाते, असे कायद्याचे अभ्यासक सांगतात. महत्त्वाचे म्हणजे 153 (अ) कलमाखाली जर आरोपला अटक झाली तर त्या व्यक्तीला जामीन देण्याचा अधिकार पोलिसांना उरत नाही. आरोपीला थेट न्यायालयाद दाद मागून जामीन घ्यावा लागतो, असेही कायद्याचे अभ्यासक सांगतात. (हेही वाचा, Maharashtra Police on MNS: बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासह मनसे नेत्यांना नोटीसा; महासंचालकांचाही कडक इशारा, महाराष्ट्र पोलीस अॅक्शन मोडमध्ये)
दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश भोसले यांनी म्हटले की, राज ठाकरे यांना अटक करण्याचाच सरकारचा प्रयत्न आहे. जर राज ठाकरे यांना अटक झाली तर महाराष्ट्रभरातील मनसे कार्यकर्ते आणि हिंदू रस्त्यावर उतरतील असेही अविनाश भोसले यांनी म्हटले.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सरकार सुरुवातीपासूनच करत आले आहे. आम्हाला खटल्यांची पर्वा नाही. पाठीमागील अनेक वर्षे आम्ही खटले अंगावर घेत आलो आहोत. खरं म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच म्हटले होते मशिदींवरील भोंगे उतरवा. असे असताना आज त्याच बाळासाहेबांचा मुलगा मशिदीवरील भोंगे खाली काढा म्हटल्यावर गुन्हा दाखल करत आहे, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.