Aurangabad: पोटच्या दोन मुलांना बाल्कनीतून खाली फेकल्यानंतर एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

ही घटना औरंगाबादच्या (Aurangabad) वाळूज (Waluj) औद्यागिक नगरातील बजाजनगर येथे आज (3 मे 2021) दुपारी घडली आहे.

Representational Image | (Photo Credits: PTI)

पोटच्या दोन मुलांना बाल्कनीतून खाली फेकल्यानंतर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना औरंगाबादच्या (Aurangabad) वाळूज (Waluj) औद्यागिक नगरातील बजाजनगर येथे आज (3 मे 2021) दुपारी घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस घटनस्थळी दाखल झाले आहेत. या घटनेची नेमकी पार्श्वभूमी काय? याचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला की आणखी दुसरे कारण आहे? याचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिता आतकर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. अनिता या वाळुज महानगर भागातील बजाजनगर येथे आपल्या परिवारासोबत राहते. परंतु, आज दुपारी अनिता यांनी आपल्या दोन मुलांना बाल्कनीत खाली फेकले आणि स्वत:ही उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात एका वर्षाच्या सोहम आतकरचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अनिता यांच्यासह त्यांची तीन वर्षाची मुलगी प्रतिक्षा गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे देखील वाचा- Nagpur: कोरोना संकटात अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, नागपूर येथील धक्कादायक प्रकार

या घटनेनंतर पोलिसानी या महिलेच्या घरात पाहणी केली. तसेच शेजारी राहणाऱ्या लोकांकडे विचारपूस केली. यावेळी अनिता या वर्षाभरापासून मानसिक आजारावर उपचार घेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच तिने आपल्या मुलांना दुसऱ्या मजल्यावरून खाली का फेकले? किंवा स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या प्रकरणाची नोंद एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र टाईम्सने वृत्त दिले आहे.