IPL Auction 2025 Live

Aurangabad मध्ये अघोरी प्रकार; 25 वर्षीय व्यक्तीने स्वत:चा गळा चिरुन शिवलिंगावर केला रक्ताचा अभिषेक

एका 25 वर्षीय व्यक्तीने स्वत:चा गळा चिरुन शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक केला. औरंगाबाद येथील पैठण मधील महादेव मंदिरात या व्यक्तीचा मृतदेह सापडला.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

औरंगाबाद (Aurangabad) येथून एक अघोरी प्रकार समोर येत आहे. एका 25 वर्षीय व्यक्तीने स्वत:चा गळा चिरुन शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक केला. औरंगाबाद येथील पैठण (Paithan) मधील महादेव मंदिरात (Mahadev Temple) या व्यक्तीचा मृतदेह सापडला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धेला बळी पडून या व्यक्तीने असे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. नंदू घुंगसे (Nandu Ghungase) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. ते कहारवाड (Kaharwad) गावातील रहिवासी असून मच्छिमारीचा व्यवसाय करत होते. या घटनेसाठी 4 प्रत्यक्षदर्शींची साक्ष मिळाली आहे. (अंधश्रद्धेचा कहर! मेळघाटात जन्मदात्या मातापित्यानेच 8 महिन्याच्या बाळाच्या पोटावर दिले गरम विळ्याचे चटके)

पैठण शहरातील गागाभट्ट चौकामधील सिद्धी अली दर्ग्याजवळ हे मंदिर आहे. बिहारी परदेशी नामक व्यक्ती मंदिरामध्ये पाया पडायला गेली असता त्यांना घुंगसे यांचा मृतदेह आढळून आला. परदेशी यांनी त्वरीत पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घुंगसे यांना हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. (Rajasthan Suicide: धक्कादायक! अल्पवयीन मुलीला जिंवत जाळून एका मांत्रिकाची आत्महत्या; राजस्थानच्या बारमेर येथील घटना)

प्रत्यक्षदर्शींपैकी एका व्यक्तीने सांगितले की, "घुंगसे यांना स्वत:चा गळा चिरुन शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक केला." आपल्यावर खूनाचा आरोप येईल या भीतीपोटी प्रत्यक्षदर्शींनी त्याला अडवण्याचा प्रयत्न नाही केला. सुरुवातीला कुठल्याही प्रत्यक्षदर्शीने घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती देण्यास नकार दिला होता. परंतु, एका प्रत्यक्षदर्शीने पुढे येऊन पोलिसांना या प्रकाराबद्दल माहिती दिली. त्यानंतर सर्व प्रत्यक्षदर्शींशी बोलल्यानंतर घुंगसे यांनी अहोरी प्रकारातून स्वत:;ची हत्या केल्याच्या निष्कर्षावर पोलिस पोहचले.

अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याने अनेक लोकांकडून अघोरी प्रकार घडतात. त्यातून बळी देणे यांसारख्या घटना समोर येतात. अंधश्रद्धेचा पगडा इतका भयंकर असतो की, स्वत:चा किंवा स्वत:च्या बाळाचा, जवळच्या व्यक्तींचा बळी देण्यासही मागे पुढे पाहिले जात नाही.