धक्कादायक! पनवेलमध्ये चोरीचा आळ घेऊन महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; त्यानंतर गळफास लावून हत्या
नवी मुंबईच्या पनवेलमधील (Panvel) दुंद्रे गावात महिलेला पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर त्या महिलेला गळफास लावण्यात आला.
एकीकडे निर्भया प्रकरणाबाबत सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे, तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचार थांबायचे नाव घेत नाहीत. काही दिवसांपूर्वी वर्ध्यातल्या हिंगणघाट (Hinganghat) येथे एका महिलेवर अॅसिड हल्ला झाला. या घटनेबाबत सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्यात आता मुंबईमध्ये महिलेला पेटवून दिल्याचे वृत्त आहे. नवी मुंबईच्या पनवेलमधील (Panvel) दुंद्रे गावात महिलेला पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर त्या महिलेला गळफास लावण्यात आला.
या घृणास्पद प्रकारामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 5 जणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, हे पाचही आरोपी सध्या फरार आहेत.पोलीस पाच फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
एका चोरीच्या आरोपावरून हे कृत्य घडल्याचे निदर्शनास आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शेजारच्या लोकांनी या महिलेवर मंगळसूत्र चोरीचा आळ घेतला होता. त्याचे रुपांतर पुढे वादामध्ये झाले. मात्र त्यानंतर हा वाद मिटलाही होता. मात्र शेजारच्या लोकांच्या मनातून ही गोष्ट काही गेली नाही. आज जबरदस्तीने पाच लोक या महिलेच्या घरात घुसले व तिला जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर त्यांनी तिला गळफास लावला, त्यातच या महिलेचा मृत्यू झाला. (हेही वाचा: वर्धा: हिंगणघाट प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक)
पनवेल पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. सध्या पाच फरार आरोपींचा शोध सुरु आहे. दरम्यान, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला भररस्त्यात जिंवत जाळल्याची घटना सोमवारी घडली होती. या प्रकरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे हिंगघाट प्रकरणातील पीडित तरूणीला लवकरच न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.