Atal Setu Become a Selfie Point: मुंबईमधील न्हावा-शेवा अटल सेतू बनला सेल्फी पॉइंट; दोन दिवसांत शेकडो वाहनचालकांना ठोठावला दंड (Watch)

कमी वेळात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लोकांना नेण्यासाठी समुद्रावर 22 किमी लांबीचा पूल बांधण्यात आला आहे, मात्र सध्या तो सेल्फी पॉइंट बनला आहे.

Atal Setu (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुंबईमधील (Mumbai) अटलबिहारी वाजपेयी न्हावा-शेवा अटल सेतू (MTHL) शनिवारपासून सर्वसामान्य वाहनचालकांसाठी खुला झाला. पहिल्याच दिवशी वाहनचालकांमध्ये या पुलाबद्दल प्रचंड उत्साह होता. केवळ हा पूल पाहण्यासाठी शनिवारी अनेक लोकांनी मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवास केला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सकाळी 8 वाजल्यापासून या पुलावरून वाहनांची वाहतूक सुरू करण्याची घोषणा केली होती, मात्र प्रवाशांमध्ये इतकी उत्सुकता होती की ते नियोजित वेळेपूर्वीच तेथे पोहोचले. अनेक प्रवाशांनी पुलावर थांबून सेल्फी घेतले.

पुलावर वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. कमी वेळात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लोकांना नेण्यासाठी समुद्रावर 22 किमी लांबीचा पूल बांधण्यात आला आहे, मात्र सध्या तो सेल्फी पॉइंट बनला आहे. वाहनचालक मध्येच गाडी थांबून सेल्फी घेत आहेत. त्याचवेळी अनेकजण पुलावरील रेलिंग ओलांडून फोटो काढताना दिसले. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओ पाहता, समुद्री पुलावर रविवारी लोकांनी जॉयराईडसाठी गर्दी केल्याचे दिसून आले.

आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी एमएमआरडीएने पुलावर एक रेस्क्यू पॉइंट तयार केला असून त्याचे सेल्फी पॉइंटमध्ये रूपांतर झाले आहे. प्रवाशांचा निष्काळजीपणा पाहून पुलावर अनुचित प्रकार घडण्याची भीती प्रशासनाला वाटू लागली आहे. सेल्फीप्रेमींना रोखण्यासाठी एमएमआरडीएने पोलीस प्रशासनाला पुलावर गस्त वाढवण्यास सांगितले आहे. पुलावरून 100 किमी वेगाने वाहनांना जाण्याची मुभा असल्याने सेल्फी काढणाऱ्यांसोबत अपघाताचा धोका आहे. (हेही वाचा: Mumbai Trans Harbour Link (MTHL) Photos: उद्या होणार देशातील सर्वात लांब सागरी सेतू- मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन; पहा या पुलाचे काही विहंगम फोटोज)

रविवारी नवीन अटलबिहारी वाजपेयी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) वर सेल्फी घेणे, वाहने विनाकारण थांबवणे, पुलावरील इतर वाहनांच्या हालचालींवर परिणाम करणे अशा अनेक कारणांसाठी 264 वाहनचालकांना प्रत्येकी 500 रुपये दंड ठोठावण्यात आला. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. सागरी पुलावर वाहनचालकांनी वाहन थांबविल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवण्याचा इशारा मुंबई आणि नवी मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी दिला आहे. नवी मुंबईतील न्हावा शेवा आणि मुंबईतील शिवडी दरम्यानच्या 21.8 किमी लांबीच्या देशातील सर्वात लांब सागरी मार्गाचे उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.