Aryan Khan: क्रुझवरील पार्टीत अमली पदार्थ सापडलेच नाहीत, एनसीबीचा छापा बनावट; मंत्री नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट

त्यानंतर या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री, प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी जोरदार गौप्यस्फोट केला आहे.

Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

क्रुझवरील पार्टी (Cruise Party) आणि ड्रग्ज (Drugs) प्रकरणात अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली. त्यानंतर या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री, प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी जोरदार गौप्यस्फोट केला आहे. मुंबईच्या समुद्रात क्रुझवर एनसीबीने टाकलेला छापा पूर्णपणे बनावट असून तो एका योजनेद्वारे टाकण्यात आला आहे. शिवाय या छाप्यात अधिकारी म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांनी काम केल्याचाही खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे. हायप्रोफाईल आरोपी असलेल्या आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना भाजपचे पदाधिकारी पकडून ओढत नेत होते, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे. तसेच, क्रुझवर कोणत्याही प्रकारे अंमली पदार्थ सापडले नसल्याचा दावाही मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी नवाब मलिक यांनी काही व्हिडिओ आणि फोटो प्रसारमाध्यमांना दाखवले. या व्हिडिओमध्ये आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना काही लोक अटक करुन ओढत नेताना दिसत होते. या दोघांना ओढून नेत असलेले लोक म्हणजे जे. पी. गोसावी आणि मनीष भानुशाली असल्याचे मलीक म्हणाले. मनीष भानुशाली हे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार यांच्यासह अनेक नेत्यांसोबत फोटो आहेत. तसेच, जे पी गोसावी हेदेखील भाजप पदाधिकारी आहेत. एनसीबीने मारलेल्या छाप्यात हे नेते कसे होते? असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. (हेही वाचा, शाहरुख खानची मॅनेजर Pooja Dadlani एनसीबी च्या ऑफिस बाहेर स्पॉट)

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत काही फोटो दाखवले. हे फोटो दाखवत मलिक यांनी दावा केला की, क्रुझवर जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ हे क्रुझवरील नव्हे तरत अमली पदार्थ विभागीय संचालकांच्या कार्यालयातील आहेत. छापा मारल्यानंतर एक कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. या फोटोवरुन पुढे येते की, क्रुझवरील छाप्यात कोणत्याही प्रकारची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन छापेमारी करण्यात आली नाही, असा गंभीर दावा नवाब मलीक यांनी केला.