Aryan Khan Drugs Case: समीर वानखेडे यांची ACP दर्जाच्या अधिकाऱ्याद्वारे चौकशी
नवाब मलिक यांच्या आव्हानावर आता समिर वानखेडे काय प्रत्युत्तर देतात याबाबत उत्सुकता आहे.
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी ACP दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. वानखेडे यांच्या विरोधात आलेल्या सर्व तक्रारींची चौकशी अधिकारी करणार आहेत. मुंबईतील चार पोलिस ठाण्यांमध्ये आतापर्यंत समीर वानखेडे आणि संबंधित प्रकरणांबाबत तक्रारी आल्या आहेत, असे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान, एनसीबी (NCB) आणि महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यातील संघर्ष आता अधिकच वाढला आहे. आता तर नवाब मलिक (Nawab Malik) यांनी थेट भूमिका घेत जाहीर आव्हानच दिले आहे. नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, एनसीबीचे संचालक समीर वानखेडे ( Sameer Wankhede) यांच्या विरोधात आपण केलेले आरोप जर खोटे असतील तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. नवाब मलिक यांच्या आव्हानावर आता समिर वानखेडे काय प्रत्युत्तर देतात याबाबत उत्सुकता आहे.
समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता नवाब मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांनाच आव्हान देत 'वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा निघाल्यास मंत्रिपद सोडेन' असे म्हटले आहे. समीर वानखेडे यांनी फसवणुकीच्या मार्गाने IRS मध्ये महत्त्वाच्या पदाची नोकरी मिळवली. मी ज्या मुद्द्यावर बोलत आहे तो धर्माशी संबंधीत नाही. त्यांनी ज्या फसवणुकीच्या मार्गाने आयआरएसची नोकरी मिळवली आणि एका पात्र असणाऱ्या अनुसूचित जातीच्या व्यक्तीला त्याच्या अधिकार, हक्क आणि भविष्यापासून वंचित ठेवले ते मला जनतेसमोर आणायचे आहे, असे ट्विट मलिक यांनी केले आहे. (हेही वाचा, Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी प्रभाकर साईल यांच्या गौप्यस्फोटानंतर नवाब मलिक, संजय राऊत आक्रमक; दिवसभरातील ठळक घडामोडी)
ट्विट
दरम्यान, ड्रग्ज प्रकणात आतापर्यंत पाठिमागील वर्षभरातून झालेल्या कारवाईबाबतही नवाब मलिक यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे. ड्रग्ज प्रकरणात जवळपास एक वर्षापासून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्याच्या आधारे दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना बोलावण्यात आले होते, परंतु यापैकी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे सत्य शोधण्यासाठी. आपण याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि मालदीवच्या दौऱ्यावर देखील, असे महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे. मालदिवमध्ये समीवर वानखेडे किंवा त्यांच्याशी संबंधितांना कोणकोणते अभिनेते अभिनेत्री भेटले यांची माहिती पुढे यायला हवी, असेही मलिक म्हणाले.